Maratha Kranti Morcha ओगलेवाडीत जाळपोळ; कऱ्हाडात महामार्ग रोखला, कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:32 PM2018-07-25T12:32:42+5:302018-07-25T12:35:51+5:30
मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यापारी, विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटवून दिल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी व्यापारी, विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. गुहाघर-विजापूर महामार्गावर ओगलेवाडी येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटवून दिल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा आरक्षणासाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी युवकांनी दुचाकी रॅली काढली.
घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी रस्त्यावर पेटत असलेले टायर बाजूला काढले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मराठा आरक्षणासाठी सध्या रान पेटले आहे.
एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवारी कऱ्हाडात पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेतही हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. पदयात्रा आणि ठिय्या आंदोलनामुळे आंदोलनाचे वातावरण तयार झाले असतानाच बुधवारी बंदची हाक देण्यात आली.
शहरात सकाळपासूनच सर्व व्यवहार ठप्प ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला. शहरासह ग्रामीण भागातही बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
दुचाकी रॅलीस प्रतिसाद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी युवकांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगव्या टोप्या आणि झेंडे हातात घेतलेले युवक दुचाकीवरून बसस्थानकमार्गे मुख्य बाजारपेठेतून कृष्णा नाक्यावर व पुन्हा बसस्थानकमार्गे कार्वे नाक्याकडे मार्गस्थ झाले. यावेळी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.