Maratha Kranti Morcha साताऱ्यात पोलिसांचा हवेत गोळीबार, आंदोलनाला हिंसक वळण; पोलीस व्हॅन फोडली; तीन पोलीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:05 PM2018-07-25T14:05:20+5:302018-07-25T14:25:29+5:30
मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांचा मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले.
सातारा : मराठा आरक्षणासाठी संतप्त झालेल्या समाजबांधवांचा मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमाव आणखी हिंसक झाल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले.
मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी दुपारी मोर्चा काढल्यानंतर आंदोलक आपापल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर अचानक महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू झाली. काही संतप्त जमावाने चक्क पोलीस व्हॅनलाच लक्ष्य केले. दगडफेकीत पोलीस व्हॅनचे आणि एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले.
जमाव आणखीनच हिंसक बनत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी जमाव विखुरला होता. पोलिसांनी पाठलाग करून काही जणांना ताब्यात घेतले. अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना मोठा फौजफाटा महामार्गावर तैनात करावा लागला.
महामार्गालगत असणाऱ्या वाहनांच्या शोरूमवरही दगडफेक केली. आंदोलक हिंसक बनत चालल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. महामार्गावर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
कोल्हापूर आणि पुणे बाजूकडून ये-जा करणारी वाहने काही काळासाठी जागच्या जागी थांबविण्यात आली आहेत. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.