Maratha Kranti Morcha : सातारा : गुहाघर-विजापूर महामार्गावर जाळपोळ, पाटण तालुक्यात तासभर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:10 PM2018-07-28T13:10:50+5:302018-07-28T13:15:24+5:30
मराठा आरक्षणासाठी मुंबईत निघालेल्या मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील रोहन तोडकर या युवकाचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यात उमटले. आंदोलकांनी गुहाघर-विजापूर महामार्गावर जाळपोळ केली. सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. तालुक्यात तणाव निर्माण झाला असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
मल्हारपेठ (सातारा) : मराठा आरक्षणासाठी मुंबईत निघालेल्या मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील रोहन तोडकर या युवकाचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यात उमटले. आंदोलकांनी गुहाघर-विजापूर महामार्गावर जाळपोळ केली. सुमारे तासभर महामार्ग रोखून धरला. तालुक्यात तणाव निर्माण झाला असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
राज्यभर सध्या मराठा आरक्षणासाठी मोर्चा, आंदोलने केली जात आहेत. सातारा जिल्ह्यातही बुधवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या मोर्चाला हिंसक वळण लागून लाखो रूपयांची हानी झाली. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असताना बुधवारी मुंबईत निघालेल्या मोर्चामध्ये पाटण तालुक्यातील खोणोली येथील रोहन तोडकर या युवकाचा मृत्यू झाला.
शुक्रवारी ही घटना समोर आल्यानंतर पाटण तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शुक्रवारी सकाळी रोहनचा मृतदेह घेऊन येणारी रूग्णवाहिका आंदोलकांनी चाफळ येथे अडविली. तसेच जाळपोळ, आंदोलन करून रोहनवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी हमीनंतर तणाव निवळला. मात्र, या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पाटण बंदची हाक देण्यात आली.
शनिवारी सकाळपासून तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. त्यातच आंदोलकांनी निसरेफाटा येथे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलन सुरू केले. त्यांनी गुहाघर-विजापूर महामार्ग रोखून धरला. सुमारे तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यानंतर आंदोलक नवारस्ता येथे एकत्र आले. त्याठिकाणीही रस्त्यावर जाळपोळ करून वाहतूक रोखून धरली. या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आमदारांची रस्त्यावर बैठक
निसरेफाटा येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार शंभुराज देसाई त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आंदोलकांनी रस्त्यावरच बैठक मारली. त्यांच्यासोबत आमदार देसाई हेसुद्धा रस्त्यावरच बसून आंदोलकांमध्ये सहभागी झाले.