Maratha Kranti Morcha : सातारा : मुंबईच्या दंगलीत पाटणच्या युवकाचा मृत्यू, आंदोलक आणखी भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:40 PM2018-07-27T13:40:38+5:302018-07-27T15:49:18+5:30
नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात झालेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोलीच्या एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने आंदोलक आणखी भडकले. शुक्रवारी सकाळी संबंधित युवकाचा मृतदेह गावी आणण्यात येत असताना चाफळमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करीत रुग्णवाहिका अडवून धरली. दुपारपर्यंत जमाव आक्रमक भूमिकेत होता.
चाफळ (सातारा) : नवी मुंबईतील कोपरखैरणे भागात झालेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोलीच्या एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने आंदोलक आणखी भडकले. शुक्रवारी सकाळी संबंधित युवकाचा मृतदेह गावी आणण्यात येत असताना चाफळमध्ये आंदोलकांनी जाळपोळ करीत रुग्णवाहिका अडवून धरली. दुपारपर्यंत जमाव आक्रमक भूमिकेत होता.
रोहण दिलीप तोडकर (वय १९, रा. खोणोली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खोणोली येथील रोहण तोडकर हा युवक परिसरातीलच काही युवकांसमवेत कोपरखैरणेच्या एका खासगी कंपनीमध्ये नोकरीस होता.
संबंधित युवकांसोबतच तो कोपरखैरणेमध्ये वास्तव्यास होता. बुधवारी राज्यभर मराठा क्रांती आंदोलन सुरू असताना रोहणही कोपरखैरणे भागात निघालेल्या आंदोलनात सहभागी झाला. त्यानंतर या भागात जाळपोळ, तोडफोड झाली. पोलिसांनीही बेसुमार लाठीमार केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असताना रोहण रात्री उशिरापर्यंत रुमवर परत आला नाही. त्यामुळे त्याच्यासमवेत राहणाऱ्या मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच घटनेची माहिती नातेवाइकांनाही दिली.
रोहणचे नातेवाईक तसेच मित्र गुरुवारी सकाळी तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात गेले. रोहण बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना जे. जे. रुग्णालयात जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार सर्वजण रुग्णालयात गेले. त्यावेळी त्याठिकाणी शवगृहात रोहणचा मृतदेह बेवारस आढळून आला.
दंगलीवेळी झालेल्या लाठीमारात रोहण गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी रोहणच्या नातेवाइकांना सांगितले आहे. मात्र, आंदोलनावेळी एका जमावाने तलवारीने वार करून तसेच मारहाण करून रोहणचा खून केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आंदोलक आणखी भडकले आहेत.
रोहणचा मृतदेह शुक्रवारी सकाळी घेऊन एका रुग्णवाहिका त्याच्या मूळगावी खोणोली येथे येत होती. आंदोलकांनी पाटण तालुक्यातील चाफळ येथे संबंधित रुग्णवाहिका अडवली. काही युवकांनी नजीकची झाडे तोडून रस्त्यावर टाकली. तसेच चाफळ बसस्थानकात टायरही पेटविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला.
आमदार शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पोवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी त्याठिकाणी दाखल झाले. रोहणच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. मात्र, तरीही आंदोलक आक्रमक भूमिकेत होते. दुपारी १२ वाजेपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका आंदोलकांनी रस्त्यातच अडवून धरली होती.