मराठा तो मराठाच.. अंत पाहू नका !
By admin | Published: September 20, 2016 12:14 AM2016-09-20T00:14:02+5:302016-09-20T00:14:44+5:30
उदयनराजेंचा पुनरुच्चार : अॅट्रॉसिटी कायदा रद्द झालाच पाहिजे
सातारा : ‘पाऊस असल्यावरच छत्री घेऊन आपण बाहेर पडतो, पाऊस नसताना कोणी छत्री उघडून घराबाहेर पडत नाही. ज्या काळात अॅट्रॉसिटी कायद्याची गरज होती, तो काळ फार जुना झाला. जमीन अस्मानाचा फरक झाला असून, जातीवाद संपुष्टात आलेला आहे. तसा अॅट्रॉसिटी कायदाही संपुष्टात आला पाहिजे. कारण ‘मराठा तो मराठाच.. आमचा अंत पाहू नका’ असा पुनरुच्चार खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना केला.
‘मराठा खडा तो सरकारसे बडा. जिल्ह्यातील नेत्यांना लाज असेल, तर त्यांनी उघडपणे मराठ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही त्यांनी केले. उदयनराजे म्हणाले, ‘कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. त्यामुळे सर्वच समाजांना समानतेची वागणूक मिळायला हवी. अॅट्रॉसिटी कायद्याच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय केला जात आहे. या कायद्याचा वापर करून अत्याचार होत आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे. लोकांचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो, त्याला सरकार जबाबदार राहील. मात्र, त्याबाबत कुठलाही नेता उघडपणे पुढे येऊन बोलत नाही.’
उदयनराजेंनी सरकारी अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम शासकीय अधिकारी करतात. शेतकऱ्याच्या उत्पन्नातूनच त्यांचे पगार होत आहेत. संबंधितांच्या भ्रष्टाचाराची यादी माझ्याकडे आहे. त्यांची मालमत्ता जप्त केली जावी. आत्ताच फार बोलत नाही. मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा पार पाडावा.’
राजकीय नेत्यांवर शरसंधान
राजकीय नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली आहे.
जातीच्या भिंती उभ्या केल्या. मराठ्यांच्या चळवळीचे
श्रेय कुठल्याही नेत्याने घेऊ नये, असे शरसंधान उदयनराजेंनी साधले.
मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडणार
मराठा समाजाला सवलती मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेवर मी ठाम आहे.
या सवलती का गरजेच्या आहेत, त्याचा विस्तृत अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याकडे सादर करणार आहे, आता आर नाही तर पार झालंच पाहिजे, असेही उदयनराजेंनी सांगितले.