उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:35 PM2023-12-20T12:35:39+5:302023-12-20T12:37:15+5:30

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि ...

Maratha reservation issue Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik-Nimbalkar met Prime Minister Narendra Modi | उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

उदयनराजे, रणजितसिंह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याची मोदींकडून ग्वाही

फलटण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन खासदार उदयनराजे भोसले आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सकारात्मक विचार करून यावर तोडगा काढण्याची ग्वाही मोदी यांनी त्यांना दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. भेटीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर चर्चा केली.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाजघटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे; परंतु आता समाजातील मुले-मुली व कुटुंबाची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे.

समाजातील मुला-मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकून, बँक व खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी विनंती दोन्ही खासदारांनी केली.

धनगर समाजालाही न्याय मिळावा..

महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी हा समाज अनेक वर्षे झटत आहे. इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु, महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रात धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही, तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही विषयांवर सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले.

Web Title: Maratha reservation issue Udayanraje Bhosale, Ranjitsinh Naik-Nimbalkar met Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.