Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी युवक आक्रमक, क-हाडमध्ये नदीपात्रात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:58 PM2018-08-03T12:58:38+5:302018-08-03T13:18:55+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चाच्या वतीने क-हाडात गेल्या दोन दिवसांपासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
क-हाड (सातारा) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चाच्या वतीने क-हाडात गेल्या दोन दिवसांपासून महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यातच शुक्रवारी (3ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा आंदोलक कृष्णा नदीपात्रात उतरले. पाण्यात उतरून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाचा निषेध केला.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर सध्या मोर्चा, आंदोलने सुरू आहेत. क-हाडातही या आंदोलनाची धग पोहोचली असून, काही दिवसांपासून येथे मोर्चा, आंदोलने, रॅली काढून आरक्षणाची पुन्हा मागणी केली. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मराठा महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा युवक आंदोलक शहरानजीकच्या कृष्णा नदीपात्राकडे गेले. त्या ठिकाणी भगवे झेंडे उंचावून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आक्रमक आंदोलन नदीपात्रात उतरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रुपाली चव्हाण यांच्यासह तहसीलदार राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी हिम्मत खराडे या ठिकाणी पोहोचले. त्यांना आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन करीत पाण्यातून बाहेर येण्याची विनंती केली. त्यानुसार अर्धा तासाने आंदोलक नदीपात्रातून बाहेर आले. यावेळी अनेकांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.