साताऱ्यात मराठा समाजाचा मोर्चा ३ आॅक्टोबरला !
By admin | Published: September 11, 2016 11:57 PM2016-09-11T23:57:44+5:302016-09-11T23:57:44+5:30
बैठकीला तीन हजार बांधव : गर्दीचा विक्रम घडविण्याचा निर्धार
सातारा : कोपर्डी घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, मराठा समाजाला आरक्षण द्याव,े आदी मागण्यांसाठी एकत्र येत जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी साताऱ्यात दि. ३ आॅक्टोबरला ‘न भूतो न भविष्यति’ असा मराठा क्रांती मोर्चा काढण्याचा निर्धार केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे न जाता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना तिथे बोलावून निवेदन देण्याचेही ठरले.
रविवारी साताऱ्यात झालेल्या या बैठकीला सुमारे तीन हजारांहून अधिक मराठा समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. येथील स्वराज मंगल कार्यालयात साताऱ्यात निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यांतूनही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रांतील मान्यवर आले होते.
बैठकीत विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतानाच दि. ३ आॅक्टोबरचा साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चा हा विराट असा काढण्याचा निर्णय केला. त्याला सर्वांनीच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला. तसेच यावेळी मान्यवरांनी ‘आतापर्यंत राज्यात अनेक मराठा क्रांती मोर्चे निघाले आहेत. त्यापेक्षाही मोठा असा मोर्चा मराठ्यांच्या राजधानीत काढू या. त्यामुळे महाराष्ट्र घाबरला पाहिजे. राजकारण न करता सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊ या,’ असे आवाहनही केले.
साताऱ्याचा मराठा क्रांती मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर न जाता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येईल. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावे, यासाठी विनंती करण्यात येईल. त्यानंतर निवेदन देण्यात येईल. दरम्यान, साताऱ्यात होणाऱ्या या मोर्चात कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाहीही शहरातील मान्यवरांनी दिली. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय नियोजन
साताऱ्यातील रस्त्यांची स्थिती पाहता वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठीही नियोजन ठरविण्यात आले. सातारा शहरातील बांधवांचा मोर्चा गांधी मैदानापासून निघेल. जावळी, वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यांतील बांधव हुतात्मा स्मारक येथे जमा होतील. कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील बांधव बोगदामार्गे राजवाड्यावर येतील तर फलटण तालुक्यातील बांधव जुना आरटीओ आॅफिस येथे येतील. माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांतील बांधव थेट जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा होतील, असेही यावेळी ठरविण्यात आले.