महाराष्ट्राबाहेरील मराठी कर्मचाऱ्यांना मिळणार शिवजयंतीची ऐच्छिक सुटी
By दीपक देशमुख | Published: December 25, 2023 06:57 PM2023-12-25T18:57:48+5:302023-12-25T18:59:07+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांनी मानले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऐच्छिक सुटी उपलब्ध केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन दिवस ऐच्छिक सुट्या घेता येतात. महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी, म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी होती. ती मान्य करून केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक सुटीच्या यादीत १९ फेब्रुवारीचा समावेश केला आहे. या यादीत या दिवसाचा उल्लेख चुकून ‘शिवाजी जयंती’ असा झाला असून, त्याऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी केली. तीही मंत्री जितेंद्र सिंह यांनी मान्य केली.
दरम्यान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारीही जितेंद्र सिंह यांच्याकडे असल्यामुळे त्या विभागाशी संबंधित अनेक विषयांवर या भेटीत चर्चा केली. कऱ्हाड तालुक्यातील हजारमाची येथे ६०० कोटी रुपये खर्चून भूकंप संशोधन केंद्र आणि भूकंप अभ्यासाचे विद्यापीठ उभारण्यात येत आहे. हा मुद्दाही या भेटीत सविस्तर चर्चा झाली.