मराठमोळ्या 'मनाली'ची गरुडझेप, अंतराळ संस्था ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:13 PM2019-08-29T20:13:24+5:302019-08-30T08:02:33+5:30
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे.
सातारा - सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील, जावळीच्या जंगलातील सातारकर देशाच्या रक्षणासाठी काश्मीरच्या सीमारेषेवर उत्साहाने तैनात असतात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक जवान सैन्यदलाच भरती होतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील देशपातळीवर एक वेगळीच ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा, लढवैय्या आणि शूरवीरांचा जिल्हा म्हणून साताऱ्याकडे पाहिले. साताऱ्याच्या या मातीतील एका युवतीने अंतराळात झेप घेतली आहे. देशाची अंतराळ संशोधन असलेल्या इस्रोमध्ये साताऱ्याच्या मनाली महेंद्र सपाटे हिची निवड झाली आहे. त्यामुळे, साताऱ्यासह महाराष्ट्रासाठी ही कौतुकाची बाब आहे.
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील राजापूर या लहानशा गावातील मनालीची ही गरुडझेप साताऱ्यात कौतुकाचा विषय बनला आहे. मनाली महेंद्र सपाटे हिची इंडियन रिसर्च सेंटर( इस्रो) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. मनालीच्या संशोधनातून सातार्याचा झेंडा आता इस्रोमध्येही झळकणार आहे. मनालीसह तिच्या कुटुंबीयांना अत्यानंद झाला आहे. सन 2018 मध्ये दिलेल्या परीक्षेत आणि त्यानंतरच्या मुलाखतीमधून तिची निवड करण्यात आली आहे.
मनालीचे मूळ गाव राजापूर, ता. खटाव हे असून वडील महेंद्र सध्या सातारा येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्ताराधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर, आई गृहिणी आहे. मनालीचे प्राथमिक शिक्षण राजापूर जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर, माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात घेतले. त्यानंतर, मनालीने एमटेकचे उच्च शिक्षण बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पूर्ण केले. एमटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनालीने गेट परीक्षेत देशात 13 वी रँक मिळवत यश मिळवले. या निवडीबद्दल मनालीचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी.आर. गारळे, नरेगाचे उपसचिव प्रमोद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी श्रीमती क्रांती बोराटे, उदयकुमार कुसूरकर, संभाजी पाटील, संदीप दीक्षित, जयवंत ढाणे व राजापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केले. तसेच स्थानिक पुढाऱ्यांनीही याबाबत मनालीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, मनालीची ही नियुक्ती साताऱ्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची निवड आहे. कारण, मनालीच्या रुपाने इस्रोमध्येही आता मराठी झेंडा फडकला आहे.