मराठी क्रांती महामोर्चा विशेष :
By Admin | Published: October 3, 2016 11:53 PM2016-10-03T23:53:35+5:302016-10-04T01:05:09+5:30
निशब्द हुंकार !‘अॅट्रॉसिटी’ बदलासह एकूण २० मागण्या
सातारा- महत्वाची क्षणचित्र.
आजवर मराठा समाज दात्याच्या, पोशिंद्याच्या भूमिकेत राहिला आहे़ मात्र, महाराष्ट्राच्या समाजव्यवस्थेतील थोरला भाऊ असणारा मराठा समाज सरकारकडे न्याय आणि रास्त अशा मागण्या करीत आहे़ त्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी हा समाज मागणी करीत आहे़
कोपर्डी (नगर) येथे अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला़ तिचा खून झाला ही आम्हाला हादरविणारी घटना आहे़ या अत्याचार आणि खून प्रकरणात ८० दिवस उलटून गेले तरी अजून आरोपपत्र दाखल नाही़ ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे़ दहा दिवसांत हे आरोपपत्र दाखल करा़ आरोपींवर गुन्हा शाबित होईल़, अशा पद्धतीने खटला चालवा आणि गुन्हा सिद्ध करून आरोपींना फाशीची शिक्षा द्या़ अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्येही अटकपूर्व जामीन दिला जातो; पण अॅट्रॉसिटी कायद्यात अटकपूर्व जामीन मिळत नाही़ या कारणास्तव व इतर काही बाबीमुळे या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो़ सरकारी अधिकारी, मराठा समाजातील व्यक्तींना ब्लॅकमेल केले जाते़ वेठीस धरले जाते़ हा कायदा काही लोकांचे जगण्याचे साधन बनला आहे़ त्यामुळे या कायद्यात न्याय स्वरुपाचे बदल करा़ हा कायदा केंद्र सरकारचा आहे, असे सांगितले जाते. आम्ही भारताचे नागरिक आहोत़ त्यामुळे चार कोटी मराठा बांधव व समाजातील इतर जाती बांधवांची अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाची मागणी सरकारने विचारात घेऊन या कायद्यात बदल करावा़
शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने अंमलात आणा़
मराठा समाजाला मराठा जात म्हणून नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण द्या़ गरज पडली तर कायद्यात, घटनेत बदल करा़
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाचे काम तातडीने सुरू करा़ हे स्मारक यथोचित आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत होईल़ या संबंधीचे नियोजन करा़
शेतमालावरील सर्व प्रकारची निर्यात बंदी उठवा़ निर्यातीवरचे कर तातडीने रद्द करा़
शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटापासून त्यांच्या शेती व पूरकउत्पन्नाला, संरक्षण, कायद्याने देण्यासाठी, जगातील प्रगत व प्रगतशील देशाप्रमाणे ‘शेती उत्पन्नातील जोखमीचे व्यवस्थापन’ हा कायदा राज्य सरकारने आर्थिक तरतुदीसह करावा व पाच वर्षांत पूर्ण राज्यात राबवावा. यासाठी राज्य सरकारने २००५ मध्ये माजी मुख्य सचिव रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती. याच्या कार्यवाहीस विलंब झाल्यानेच महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.
राज्यात गेल्या चार वर्षांत अभूतपूर्व दुष्काळामुळे शेती व पूरक व्यवसायाची सर्व कर्जे बँकांचे एनपीए तरतुदीची मदत घेऊन पूर्ण ताबडतोब माफ करावी.
शेती व पूरक व्यवसायातील सर्व उत्पादनाला, प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर आधारित, सरकारने भाव देण्याचा कायदा करून त्याची ताबडतोब कार्यवाही करावी.
सार्वजनिक उपक्रम वा खासगी उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यास त्या भाडेपट्ट्यानी घ्याव्यात. शेतकऱ्यांची मालकी, त्यांच्या क्षेत्राची रहावी आणि फायद्यात शेतकऱ्यांचा सहभाग हवा.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज असल्यास माफ करावे आणि त्याच्या वारसदाराना शासकीय नोकरी द्यावी. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबाला दहा लाख भरपाई द्यावी.
पूर्ण वेळ शेतकऱ्यांच्या शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांची फी व जेवण व राहण्याचा खर्च शासनाने करावा.
सिंचनाच्या सर्व अपूर्ण योजना तीन वर्षांत पूर्ण कराव्यात.
वर उल्लेख करण्यात आलेल्या मागण्या संपूर्ण समाजाने त्या आपणापर्यंत पोहोचवल्या आहेत़ वरील सर्व मागण्या न्याय स्वरूपाच्या आहेत़ त्यावर निर्णय घ्यावा़ या व्यतिरिक्त संपूर्ण सातारा जिल्ह्याच्याही काही मागण्या आहेत़ त्याचा विचार होऊन त्यावर निर्णय व्हावा, अशी मागणी हा मोर्चा करीत आहे़
सातारा येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज काही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही़ मंजूर झालेले हे वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू होण्यासंबंधी कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू करण्यात यावी़
अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला निधी तातडीने पुन्हा देण्यात यावा़
सातारा जिल्ह्यात देशातील पहिले प्रतिसरकार स्थापन झाले होते़ १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याला ६० वर्षे पूर्ण झाली़ त्यावेळी प्रतिसरकारचे स्मारक करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर केला होता़ या निधीअंतर्गत प्रतिसरकारचे कोणतेही आणि कसलेही स्मारक उभे राहिलेले नाही. प्रतिसरकारचे स्मारक उभे करण्यात यावे़
मराठा साम्राज्याची रणरागिणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाचा माहुली येथे जीर्णोद्धार करावा़
सातारा येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र
सुरू करण्यात यावे़
गडकोट, किल्ल्यांचे
संवर्धन करण्यात यावे़
शिरवळ येथील सुभानमंगल किल्ल्यावर खासगी व्यक्तींनी अतिक्रमण केले असून, हा किल्ला सरकारने संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करावा. आमच्या या मागण्या मान्य न केल्यास आम्हाला ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’ आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल़
आज समद्यांचाच उपवास...
माता-भगिनींना वाट देऊन दिली सलामी!
महामोर्चाच्या सांगतेनंतरही दहा किलोमीटरपर्यंत नागरिकांची रीघ
ंमहामोर्चातील क्षणचित्रे...
साताऱ्यातील महामोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद मैदानाकडे निघाले असताना.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्षानुवर्षे राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. मराठा महामोर्चाच्या निमित्ताने या बँकेतील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याभोवती प्रथमच भगवे वादळ पाहायला मिळाले.
कोल्हापूर येथील महादू रानडे हा अपंग मराठा कार्यकर्ता महामोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून साताऱ्यात दाखल झाला होता. सोमवारी महामोर्चा असल्याने तो रेल्वेने मुक्कामी साताऱ्यात आला. रेल्वेस्टेशनवरच त्याने मुक्काम केला. सोमवारी सकाळी मिळालेल्या वाहनाने तो पोवई नाक्यावर आला होता.
साताऱ्यातील महामोर्चात या वयोवृद्ध आजींनी हिरीरीने सहभाग घेतला.
साताऱ्यातील पोवई नाक्यावर कल्पनाराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
साताऱ्यातील महामोर्चात खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी सहभाग घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची त्यांच्या भोवती झालेली गर्दी.
पोवई नाक्यावर महामोर्चावेळी तुफान गर्दी झाली होती. या गर्दीतच अनेकदा रुग्णवाहिका येत होती; परंतु मराठा कार्यकर्ते या रुग्णवाहिकेला अशी जागा देत होते.
पोवई नाक्यावरून संपूर्ण महामोर्चा मार्गावर आवाज ऐकू जावा, यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात आली होती. नाक्यावरील ठिकाणावरून त्यांचे कंट्रोल सुरू होते.