मराठी माणूस म्हणून आखाती देशात उद्योगसाम्राज्य उभारल्याचा अभिमान
By admin | Published: July 6, 2016 11:45 PM2016-07-06T23:45:25+5:302016-07-07T00:42:25+5:30
धनंजय दातार : कृष्णा अभिमत विद्यापीठास सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांसमोर उलगडला जीवनपट
कऱ्हाड : ‘व्यवसाय हे मराठी माणसाचे काम नव्हेच असा जणू अलिखित नियमच झाला होता; पण या नियमाला आणि समजुतीला फाटा देत काही मराठी माणसांनी उद्योग-व्यवसायात आपले पाय भक्कम रोवले आहेत. काहींनी भारतातच नव्हे तर परदेशातही आपल्या यशाची गुढी उभारली आहे. माझ्या घराण्यातही उद्योगाचा कोणताही वारसा नव्हता. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या एका मराठी माणसाने आखाती देशात आपले उद्योगाचे साम्राज्य उभे केले, याचा नक्कीच अभिमान आहे,’ असे प्रतिपादन आखाती देशातील उद्योजक, मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठास डॉ. धनंजय दातार यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच वैद्यकीय आणि व्यवस्थापन शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डॉ. दातार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना दातार, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनायक भोसले, सिद्धार्थ घाटगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी डॉ. दातार यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी डॉ. दातार म्हणाले, ‘विदर्भातील असल्याने घरची परिस्थितीही सामान्यच होती. वडील पस्तीस वर्षांपूर्वी दुबईत कामासाठी गेले होते. त्यांना मदत करण्यासाठी मीही दुबईत गेलो. त्या ठिकाणी असलेल्या एका किराणा मालाच्या दुकानातून खऱ्या अर्थाने व्यवसायास प्रारंभ झाला. तो आज ‘अल अदिल ट्रेडिंग’ कंपनीमार्फत संपूर्ण अरबमध्ये पसरला आहे. याशिवाय आमचे आता तुळजा एक्सपोर्ट इंडिया आणि पिकॉक ब्रँड या नावाची मसाले उत्पादनेही जगभरात जातात. तसेच मसाला किंग एक्सपोर्ट इंडिया कंपनीतून जवळजवळ सुमारे सहाशे प्रकारचे भारतीय पदार्थ जगभर पोहोचवले जातात. व्यवसाय हा नेहमी जपूनच करावा. कोणतेही काम लहान अथवा कमीपणाचे मानू नका. सतत सकारात्मक विचार करा. मनामध्ये जिद्द ठेवा म्हणजे उद्योगावर यशाची मोहर नक्की उमटेल.’
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. दातार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. याप्रसंगी कृष्णा विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, अर्चना कौलगेकर, कृष्णा फाउंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. विनोद बाबर यांच्यासह डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)