मराठी अभ्यासक शंभरच्या आतच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:47 AM2020-02-28T00:47:34+5:302020-02-28T00:49:22+5:30
मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
सातारा : मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषेच्या समृद्धतेचा जागर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र याविषयी प्रचंड अनास्था दिसत आहे. सातारा शहरातील महत्त्वाच्या तीन महाविद्यालयांमध्ये मराठी अभ्यास करणाऱ्यांची संख्या शंभराच्या आतच असल्याचे चित्र आहे.
मराठी भाषा विविधतेने नटलेली आणि समृद्ध भाषा असली तरीही या भाषेच्या अभ्यासातून भविष्यकालीन अर्थार्जनाची सोय होत नसल्याचे तरुणाईचं म्हणणं आहे.
मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
सातारा शहरात मराठी विभागात सर्वाधिक विद्यार्थी संख्या शिवाजी कॉलेजमध्ये आहे. त्यानंतर लाल बहाद्दूर शास्त्री आणि कला व वाणिज्य महाविद्यालयाचा क्रमांक येतो. या तिन्ही महाविद्यालयांची बेरीज करूनही शंभराचा आकडा मराठी अभ्यासकांचा होत नाही, असे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.