मराठवाडी धरण परिसर कोरोनाने हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:37+5:302021-06-23T04:25:37+5:30

ढेबेवाडी : मराठवाडी धरणस्थळावर कोरोनाचा फैलाव झाला आहे. अकरा कामगार बाधित आढळल्याने धरण व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ...

The Marathwadi dam area was shaken by the corona | मराठवाडी धरण परिसर कोरोनाने हादरला

मराठवाडी धरण परिसर कोरोनाने हादरला

googlenewsNext

ढेबेवाडी : मराठवाडी धरणस्थळावर कोरोनाचा फैलाव झाला आहे. अकरा कामगार बाधित आढळल्याने धरण व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांपैकी अनेकजण परप्रांतीय असून कोरोना केअर सेंटरबरोबरच काहींवर कोरोना हॉस्पिटलमध्येही उपचार सुरू आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याचा धरणाच्या बांधकामावरही थोडाफार परिणाम जाणवत आहे.

मराठवाडी धरणाच्या बांधकामावर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कामगार कार्यरत आहेत. धरणस्थळी पत्र्याच्या शेडवजा खोल्यांमध्ये ते राहतात. सहा दिवसांपूर्वी तीन कामगारांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील जाधव व त्यांचे सहकारी संदीप साळुंखे, सिद्धार्थ गवई, शंतनू पाटील, मेघा मराठे, कांता बर्डे, स्वाती थोरात, डी. एस. करवते आदींनी धरणस्थळी जाऊन चाळीस कामगारांची चाचणी केली. त्यातील आठजण बाधित आढळले.

काहींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. अकरा बधितांपैकी तिघांवर कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अँटिजन चाचणी निगेटिव्ह आलेल्या वीस जणांची आरटीपीसीआर टेस्टही घेण्यात आली असून, त्याचा अहवाल रात्रीपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे रुग्णसंख्या आणखीन वाढण्याची भीती आहे. अकराही रुग्णांच्या संपर्कातील लोकांची चार दिवसांनी पुन्हा चाचणी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. बाधितांपैकी अनेक कामगार बांधकाम करणारे आहेत. कोरोनाच्या फैलावाचा थोडाफार परिणाम धरणाच्या बांधकामावरही दिसून येत आहे. जंतुनाशक फवारणीसह विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, सर्व कामगारांना आवश्यक दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभाग व धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

(कोट)

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आम्ही आरोग्य यंत्रणेच्या सतत संपर्कात आहोत. लवकरच मराठवाडी धरण परिसर कोरोनामुक्त होईल.

- सुरेन हिरे

कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

फोटो २२मराठवाडी-कोरोना

मराठवाडी धरणावर काम करत असलेले कामगार कोरोनाबाधित आढळल्याने धरणाच्या बांधकामावर परिणाम जाणवत आहे.

Web Title: The Marathwadi dam area was shaken by the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.