जैन साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ फलटणमध्ये मोर्चा; शहर बंद ठेवत केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 10:38 PM2023-07-12T22:38:40+5:302023-07-12T22:38:53+5:30
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कामकुमारनंदजी महाराज यांची हत्या काही दिवसांपूर्वी झाली असून, पोलिस जैन साधू कामकुमारनंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : आचार्य श्री १०८ कामकुमारनंदजी महाराज यांच्या झालेल्या निर्घृण हत्येबाबत फलटणमधील सकल जैन समाजाकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कामकुमारनंदजी महाराज यांची हत्या काही दिवसांपूर्वी झाली असून, पोलिस जैन साधू कामकुमारनंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. या हत्येने देशात सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वत्र याचा निषेध करण्यात येत आहे. फलटणमध्ये दि. १२ रोजी सकाळी शहरातून सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.
जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये असणाऱ्या शाळा या वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधार करण्यात यावा, जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना सध्या काही समाज घटकांकडून जैन गुरुंवर प्राणघातक हल्ला करण्यात येत असून, गत पाच वर्षांमध्ये हजारो धर्मगुरुंचे बळी गेले आहेत. त्यामुळे धर्मगुरुंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दीपासून ते दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत पोलिस संरक्षण मिळावे. या कटातील आरोपी हे कर्नाटकसह इतर राज्यातील असल्याबाबत विविध माध्यमातून समजत असल्याने हा तपास कर्नाटक पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जैन सोशल ग्रुप, अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक समिती अनुप शहा, सुमित दोशी, यशराज गांधी यांच्या सह्या आहेत.