मार्डी - म्हसवड रस्ता बनलाय धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:44+5:302021-08-23T04:41:44+5:30
पळशी : म्हसवड - मार्डी ते म्हसवड या रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून जागोजागी खड्डे पडून चाळण झाली आहे. आजपर्यंत ...
पळशी : म्हसवड - मार्डी ते म्हसवड या रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून जागोजागी खड्डे पडून चाळण झाली आहे. आजपर्यंत अनेकवेळा मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्यापही झालेले नाही. संबंधित विभागही ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमिका घेत असून, या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मात्र त्रास सहन करत जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने तीनवेळा सुरू केले व दोन दिवसच काम करून पुन्हा बंद केले. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम व्हावे, यासाठी परिसरातील अनेक मान्यवर, नेतेमडळींनी प्रयत्न केले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदने दिली. त्यानंतर सातारा येथे संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुरुस्तीबद्दल सूचनाही मंत्र्यांनी केल्या होत्या. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले; पण दोन दिवस काम झाले आणि पुन्हा बंद करण्यात आले आहे. आता पावसाळा सुरू असल्याने रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ठेकेदार या रस्त्याकडे फिरकतदेखील नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
(चौकट)
मार्डी-म्हसवड रस्ता... प्रवाशांची चेष्टा
गेल्या चार वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था असून, वारंवार दुरुस्तीची मागणी होत आहे; पण या रस्त्याची कोणीही दखल घेत नसल्याने या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या मार्गावर अपघात होऊन अनेकजण जायबंदी झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोट..
या मार्गाची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करावी, चार वर्षांपासून रस्ता खराब झाला आहे.
- जवाहर देशमाने, माजी नगरसेवक, म्हसवड
(फोटो) २२ पळशी
मार्डी-म्हसवड रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.