काळोलीत कृषी विभागाला दोन वर्षांपासून मरगळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:29+5:302021-06-10T04:26:29+5:30
रामापूर : पाटण तालुक्यातील काळोली येथील बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालयात अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गेल्या दोन वर्षात चाळीस एकर ...
रामापूर : पाटण तालुक्यातील काळोली येथील बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालयात अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गेल्या दोन वर्षात चाळीस एकर शेतीत कोणतेही बीजगुणनचे काहीच काम झाले नाही. त्यामुळे ही सर्व जमीन पडून आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत.
पाटण तालुका हा पावसाचे आगर आहे. येथील जवळपास ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून असते. तालुक्यात प्रामुख्याने भात, नाचणी, ज्वारी आणि भुईमूग यासारखी पिके घेतली जातात. पाटण तालुक्यात डोंगर पायथ्याशी असणाऱ्या शेतात भाताची लागवड केली जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची लागवड चांगली आहे, त्याची लागवड कशी करायची, त्याची जोपासना कशी करायची, खतांची माहिती मिळावी, या उद्देशाने काळोली येथे कृषी विभागाचे बीजगुणन प्रक्षेत्र कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयातून तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत होते. या बीजगुणन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले, ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत होते; मात्र गेल्या दोन वर्षापासून या कार्यालयाला मरगळ आली आहे.
कऱ्हाड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गालगत काळोली येथे कृषी विभागाचे कार्यालय आणि बीजगुणन केंद्राकरिता चाळीस एकरची शेती आहे, या शेतीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना भात या महत्त्वाचा पिकासोबत इतर पिकांची शेतीविषयक प्रात्यक्षिक दाखविण्यात येत होती. उन्हाळी हंगामात गहू, हरभरा यासारख्या पिकांचे प्रात्यक्षिक दाखवले जात होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे ही चाळीस एकर जमीन पडून असल्याने या बीजगुणक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत काय काम केले, हा संशोधनाचा विषय आहे. बीजगुणनचे काहीच काम झालेले नाही. त्यामुळे या कार्यालयाने गेल्या दोन वर्षात काय काम केले? याची तपासणी का झाली नाही, असे अनेक प्रश्न तालुक्यामधील शेतकरी विचारत आहेत.
पॉईंटर करणे..
- सन २०१८-१९ या काळात या शेतीतून जवळपास ६० पोती भात काढले होते.
- या बीजगुणनच्या शेतीत फळझाडे लावण्याकडे अधिकारी आणि शासनाचा कल का?
- २०१९-२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अधिकाऱ्यांनी कृषिपंपाच्या दुरुस्तीसाठी पैसे नाहीत, म्हणून दुरुस्ती केलीच नाही.