कऱ्हाडात मंडई बंद; घरपोच भाजी विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:24+5:302021-04-22T04:40:24+5:30
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच संचारबंदी असूनही किराणा व भाजीपाला विक्रीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कऱ्हाड ...
शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच संचारबंदी असूनही किराणा व भाजीपाला विक्रीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कऱ्हाड शहरातील मुख्य बाजारपेठ रविवारपासून पालिकेने बंद केली आहे. त्याऐवजी विभागीय भाजी मंडई केंद्र सुरू केले होते. शहरात सातहून अधिक ठिकाणी भाजी विक्रीची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांपर्यंत भाजी पोहोचावी, हा पालिकेचा उद्देश होता. मात्र, भाजी विक्रीचे विक्रेंद्रीकरण करूनही पहिले पाढे पंचावन्न, अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजी खरेदीसाठी नागरिक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत होते. नागरिक नियम पाळत नव्हते, तर विक्रेतेही मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत नव्हते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला होता. ही परिस्थिती लक्षात येताच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी विभागीय भाजी विक्री केंद्रे बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यानुसार ती केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोठेही एकाच ठिकाणी बसून भाजी विकण्यास पालिकेने मनाई केली आहे. फिरून भाजी विक्री करण्याची सक्ती करण्यात आली आहे. गल्लोगल्ली फिरून विक्रेत्यांनी भाजीची विक्री करावी. ते करतानाही नियमांचे पालन करावे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी बसून भाजी विक्री करताना कोणी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालिकेकडून देण्यात आला आहे.
- चौकट
संक्रमण रोखण्यास होणार मदत
भाजी विक्रीसाठी पालिकेने ठिकठिकाणी विभागीय केंद्रे सुरू केली होती. त्याठिकाणी विक्रेते बसतही होते. मात्र, नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. मास्क सक्तीचे असतानाही ते घातले जात नव्हते. गर्दी न करता खरेदीचा नियमही पाळला जात नव्हता. त्यामुळे विभागीय भाजी विक्री केंद्रे बंद करण्यात आली असून पालिकेचा हा निर्णय कोरोना संक्रमण रोखण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
फोटो : २१केआरडी०२
कॅप्शन : प्रतिकात्मक