कोरोना पाय पसरत असल्याने आठवडे बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:04+5:302021-03-30T04:22:04+5:30
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना पाय पसरत असल्याने आठवडे बाजार बंद केले आहेत. परंतु बाहेरच्या तालुका, जिल्ह्यातून ...
आदर्की : फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोना पाय पसरत असल्याने आठवडे बाजार बंद केले आहेत. परंतु बाहेरच्या तालुका, जिल्ह्यातून दुचाकी, चारचाकीतून फेरीवाले विविध वस्तू विक्रीसाठी आणत असल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. सोशय डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण पश्चिम भागातील बिबी, आदर्की, सासवड, हिंगणगाव येथील आठवडे बाजार शासनाच्या आदेशाने ग्रामपंचायतीने बंद केले. तरीही फलटण पश्चिम भागात गावागावात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गावागावात दिवसभर फेरीवाले आईस्क्रीम, कापड, मसाले आदी माल किरकोळ विक्रीसाठी चौकाचौकात थांबून विक्री करीत असल्याने खरेदीसाठी महिला, पुरुष, मुले गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. फेरीवाले बाहेरच्या तालुका, शहरातून येत आहेत. तरी फेरीवाल्यांना संबंधित विभागाने समज देण्याची गरज आहे.
फोटो २९आदर्की-हॉकर्स
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात येत असलेल्या फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)