बाजारातील कोहळ्याला लागली एसटी संपाची नजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:02 PM2017-10-25T23:02:57+5:302017-10-25T23:04:40+5:30
सातारा : घराला नजर लागू नये, यासाठी घरात कोहळा बांधण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये रूढ आहे. सुती कापडात गुंडाळून तुळवीला बांधलेला कोहळा वर्षातून दिवाळी सणाच्या निमित्ताने बदलला जातो. यंदा एसटीच्या संपामुळे ग्रामीण ग्राहक न आल्याने भाजी मंडईत कोहळ्याला उठाव नाही मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७० टक्के माल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कोहळ्याला एसटी संपाची नजर लागल्याचे विक्रेते कुजबुजत आहेत.
साताºयात कोहळ्याला वर्षभर मागणी असते. मात्र, वर्षाचा मोठा सण म्हणून घराची स्वच्छता केल्यानंतर ग्रामीण भागात कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे. त्यामुळे वर्षाच्या सणाच्या खरेदीबरोबरच ग्रामीण भागातील लोक मंडईतून कोहळा घेऊन जातात.
यंदा मात्र एसटीच्या संपामुळे ग्रामस्थांची भलतीच कोंडी झाली. गावाकडून शहरात यायला वाहन नसल्यामुळे रोजच्या रोज दुचाकीवरून येणाºयांकडून त्यांनी दिवाळीचे साहित्य मागविले. यात कोहळ्याची खरेदी राहिली. एसटीचा संप मिटला असला तरी शेतात कामे सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांचे कोहळे खरेदी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे मंडईत कडाडलेल्या भाज्यांची जागा कोहळ्यांनी घेतली आहे.
पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमत
ग्रामीण भागात तुळवीला कोहळं बांधण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे फळ अत्यंत पवित्र मानले जाते. घरात येणाºया संकटाची पहिली चाहूल कोहळ्याला लागते आणि तो खराब होतो. त्यावरून संकटाची व्याप्ती लक्षात येते.
अशी ग्रामीण भागातील लोकांची धारणा आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने कोहळ्याला मागणी वाढते. आकारानुसार पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत कोहळे मिळते.