दोन दिवसांनंतर बाजार समिती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:22+5:302021-04-13T18:19:48+5:30
CoronaVirus Satara: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बंद असणारी सातारा बाजार समिती सोमवारी सुरू झाली. यामुळे तब्बल १ हजार ३३४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये बटाट्याची आवक तिप्पट वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली, तर वाटाण्याचा भाव कायम टिकून असल्याचे दिसून आले.
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन असल्याने दोन दिवस बंद असणारी सातारा बाजार समिती सोमवारी सुरू झाली. यामुळे तब्बल १ हजार ३३४ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये बटाट्याची आवक तिप्पट वाढल्याचे दिसून आले. भाज्यांची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली, तर वाटाण्याचा भाव कायम टिकून असल्याचे दिसून आले.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समिती वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवार आणि रविवारी बंद होती. सोमवारी सुरू झाल्यानंतर शेतमालाची मोठी आवक झाल्याचे दिसून आले.
सातारा बाजार समितीत सोमवारी ५६ वाहनांतून १ हजार ३३४ क्विंटल फळभाज्या आणि फळांची आवक झाली. बटाटा ४५९, लसूण २४ आणि आल्याची १३ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. आवक वाढल्याने काही भाज्यांच्या दरात किरकोळ घसरण झाली, तर काहींचे दर स्थिर राहिले.
सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारचा दर कमी झाल्याचे दिसून आले. तसेच शेवगा शेंगला ८० ते १०० पर्यंत दर आला. शेवगा शेंगेच्या दरात उतार दिसून आला. तर वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टमाटा ६० ते ८०, कोबीला ३० ते ५० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे. त्यातच वांग्याचाही दर कमी झाला आहे, तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० रुपये अन् दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला. फ्लॉवरच्या दरात थोडी वाढ झाली आहे.
बटाट्याची दररोज सरासरी १०० ते २०० क्विंटल आवक होते. पण, सोमवारी ४५९ क्विंटल बटाटा आला होता. बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर स्थिर राहिला आहे. हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारांपासून तीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात उतार आहे. तर लसणाला क्विंटलला २ ते ६ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही टिकून असल्याचे दिसून आले. वाटाण्याला ६ ते ७ हजारापर्यंत क्विंटलला दर मिळाला. वाटाण्याच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. बाजारात अजूनही भाज्यांचे दर कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
मेथी, कोथिंबीरचा भाव वाढला...
सातारा बाजार समितीत सोमवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. तसेच दरात सुधारणा आहे. मेथीच्या १५०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा १ हजार ते १२०० रुपये दर मिळाला, तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ७०० ते १ हजार रुपयांदरम्यान मिळाला, तर पालकला शेकडा ४०० ते ५०० रुपये दर आला.