तीन दिवसांनंतर बाजार समिती सुरू; व्यवहार जिल्हा परिषद मैदानातून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:36+5:302021-04-28T04:42:36+5:30
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सातारा बाजार समितीचा कारभार आता जिल्हा परिषद मैदानावरून सुरू झाला आहे. त्यातच ...
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सातारा बाजार समितीचा कारभार आता जिल्हा परिषद मैदानावरून सुरू झाला आहे. त्यातच तीन दिवसांनंतर बाजार समिती सुरू झाली तसेच कोरोना आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे आवक एकदमच कमी झाली. कांदा तर अवघा ४८ क्विंटल आला होता.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. त्यातच सातारा बाजार समितीचे व्यवहार आता दर शनिवार आणि रविवारी बंद असतात. त्याचबरोबर प्रशासनाने आता सातारा बाजार समितीला गर्दी टाळण्यासाठी जिल्हा परिषद मैदानावरून व्यवहार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे मंगळवारपासून जिल्हा परिषद मैदानातून शेतमालाचे व्यवहार सुरू झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर पहिल्याच दिवशी शेतमाल एकदम कमी आला. एकूण २२१ क्विंटल शेतमाल आला. यामध्ये फळभाज्यांची आवक १४१ क्विंटल झाली, तर कांदा ४८, बटाटा १५ , लसूण १६ आणि आल्याची फक्त १ क्विंटलची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची आवक मोठी होते; पण सोमवारी झालेला पाऊस आणि कोरोनामुळे उठाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी मालच कमीच आणल्याचे दिसून आले.
सातार बाजार समितीत मंगळवारी वांग्याला १० किलोला १५० ते २०० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला १०० ते १३०, कोबी ५० ते ६०, फ्लॉवर २०० ते २५०, दोडका ३०० ते ३५० आणि कारल्याला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १२०० रुपयांपर्यंत भाव आला. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा दर स्थिर आहे. त्याचबरोबर मेथी आणि कोथिंबीरची बऱ्यापैकी आवक झाली. मेथी पेंडीला शेकडा दर १७००, तर कोथिंबीरला १५०० रुपयांपर्यंत मिळाला.
फोटो दि.२७ सातारा बाजार समिती फोटो नावाने...
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा परिषद मैदानावर सातारा बाजार समितीचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय सुरू करण्यात आले आहे. (छाया : नितीन काळेल)
............................................................