बाजारपेठेत नाही कांदा... शेतकऱ्यांचा झालाय वांदा !
By admin | Published: July 29, 2015 09:41 PM2015-07-29T21:41:16+5:302015-07-29T21:41:16+5:30
बाजारपेठ ओस : आवक मंदावल्याने दर कडाडले
खंडाळा : सातारा जिल्ह्णातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लोणंद बाजार समितीकडे पाहिले जाते. परंतु सध्या बाजार समितीत कांद्याची आवक नगण्य असल्यामुळे भाव कडाडले आहेत. लोणंद बाजार समितीत या आठवड्यात कांद्याचा दर क्विंटलला तीन हजारांपर्यंत पोहोचला आहे.प्रतिकिलो ठोक बाजार तीस रुपये असला तरी शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध नसल्याने बाजारपेठ ओस पडली आहे.लोणंद परिसर हे कांद्याचे आगार मानले जाते. मात्र, येथील शेतकरी कांदा साठवण करीत नाही. शेतातून निघणारा माल थेट बाजारात नेला जातो. सध्या कांद्याचा मोसम सुरू नाही. शेतकऱ्यांच्या शेतातही कांदा नाही. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक नाही. किरकोळ स्वरूपात केवळ ५० ते १०० च्या आसपास कांदा पिशवी बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजारांपेक्षा जास्त दर क्विंटल मिळत आहे; पण कांदा आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी अवस्था सध्या आहे.तालुक्यात हळवा कांदा व गरवा कांदा अशा दोन प्रकारांची पिके घेतली जातात. सध्या हळव्या कांद्याचा मोसम आहे. मात्र, हा कांदा दिवाळीच्या दरम्यान निघत असतो आणि गरव्या कांद्याचा साठा शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे बाजारात कांद्याची कमतरता आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कडाडले आहेत. बाजारात उपलब्ध होणाऱ्या कांदा पिशवी खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मात्र चढाओढ पाहायला मिळत आहे. मर्यादित कांद्याची आवक व्यापऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. बाजारपेठेत कांदा उपलब्ध होण्यासाठी अजूनही तीन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. (प्रतिनिधी)
लोणंद बाजार समितीत सध्या कांद्याची आवक नाही. किरकोळ ५० ते ६० पिशव्यांची आवक होते. त्यासाठी प्रतिकिलो तीस रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. हळवा कांदा चालू झाल्यावर बाजारात आवक वाढेल.
- प्रकाश धापते, सचिव,
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती