गणेशोत्सवासाठी जावलीतील बाजारपेठ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:46 AM2021-09-09T04:46:28+5:302021-09-09T04:46:28+5:30
कुडाळ : गणरायाचे आगमन होत असल्याने गावोगावच्या बाजारपेठांना झळाळी आली आहे. सर्वत्र बाप्पांच्या विविध रूपातील मूर्ती पाहायला मिळत असून, ...
कुडाळ : गणरायाचे आगमन होत असल्याने गावोगावच्या बाजारपेठांना झळाळी आली आहे. सर्वत्र बाप्पांच्या विविध रूपातील मूर्ती पाहायला मिळत असून, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी गणेशोत्सव साधेपणाने करण्यात आला. यावर्षी यातून काहीसा दिलासा मिळाल्याने व्यावसायिक आनंदित आहेत. बाजारपेठेत गणेशाच्या विविध रूपातील आकर्षक मूर्तींची दुकाने सजली असून, बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी सारेजण उत्सुक आहेत. सजावटीसाठी बाजारपेठेत फुलांच्या कागदी माळा, विद्युत दिव्यांच्या माळा, मखर, कापडी छत आदी साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे.
बाप्पांचे आगमन अवघ्या एक दिवसावर आल्याने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी ही अंतिम टप्प्यात आहे. घरातील सजावटीसाठी नागरिक तयार कापडी मंडपाला पसंती देत आहेत. यावर्षीही मंडळांचा गणेशोत्सव साधेपणानेच होणार आहे. यामुळे फारसा उत्साह पाहायला मिळत नाही. गणेशोत्सवासाठी शासनाने नियमावली जाहीर केली असून, यानुसारच उत्सव साजरा करावा लागणार आहे.
(चौकट)
मंडळांनी नियमांचे पालन करावे...
तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेऊन सर्व सार्वजनिक मंडळांनी खबरदारी घेत नियमांचे पालन करून यावर्षीही गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा. याकरिता सार्वजनिक मंडळांची एकत्रित बैठक आयोजित करून तशा सूचना व मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याची कटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.