बाजारपेठ खुलली.. चेहरे फुलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:04+5:302021-07-27T04:41:04+5:30
सातारा : तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू झाली अन् व्यापारी, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्हा ...
सातारा : तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू झाली अन् व्यापारी, विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्हा प्रशासाने वेळेचे बंधन घालून का होईना, परंतु बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान, साताऱ्यातील बाजारपेठेत सोमवारी दिवसभर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले होते. एप्रिल व मे महिन्यात कोरोनाबाधित व मृतांच्या संख्येने सर्व उच्चांक मोडीत काढले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवांना यातून सूट देण्यात आली. कोरोना रुग्ण संख्या कमी होताच टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले. मात्र, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंदच होत्या. त्यामुळे व्यापारी व विक्रेत्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. वारंवार मागणी करूनही दुकाने उघडण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेतला जात नव्हता.
सातारा जिल्ह्याचा कोरोना वृद्धी कर कमी झाल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवे आदेश लागू करतानाच सोमवार, दि. २६ पासून सकाळी ९ ते ४ या वेळेत सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील सर्व आस्थापणा सुरू झाल्याने व्यापारी, विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला. साताऱ्यातील खणआळी, पाचशे एक पाटी, मोती चौक, तांदूळ आली, जुना मोटर स्टॅँड, राजपथ, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी नागरिकांनी खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली.
(कोट)
व्यापाऱ्यांनी मानले प्रशासनाचे आभार
१. सततच्या टाळेबंदीमुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्हा प्रशासाने उशिरा का होईना, परंतु बाजारपेठ खुली करण्यास परवानगी दिल्याने मोठा दिलासा मिळाला. शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.
- चेतन शहा, व्यापारी
(कोट)
२. वेळेचे बंधन घालून का होईना, परंतु सर्व आस्थापना सुरू करण्यास परवनगी दिल्याने जिल्हा प्रशासनाचे आभार मानायला हवे. दुकाने उघडल्याने आता अनेकांना काम मिळेल. आमच्या आर्थिक अडचणीदेखील कमी होतील.
- सुजाता नावंदर, कापड व्यापारी
(कोट)
३. बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी व्यापारी सातत्याने करीत होते. कोरोना रुग्ण कमी झाल्याने अखेर बाजारपेठ सुरू झाली. कोरोना नियमावली व्यापारी, विक्रेते व दुकानदारांंकडून काटेकोर पालन केले जाईल.
- राजेंद्र लाहोटी, व्यापारी
फोटो : २६ जावेद खान
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून खुली करण्यात आली. (छाया : जावेद खान)