महिलांच्या ग्रामसभेत ‘मार्केटिंग’चा फंडा !

By admin | Published: January 26, 2015 12:42 AM2015-01-26T00:42:33+5:302015-01-26T00:45:51+5:30

चाफळ येथील प्रकार : ग्रामपंचायतीनेच दिले दलालांना आवतण, जाब विचारणाऱ्या महिला सरपंचांचीच उलटतपासणी

'Marketing' fund in women's Gram Sabha! | महिलांच्या ग्रामसभेत ‘मार्केटिंग’चा फंडा !

महिलांच्या ग्रामसभेत ‘मार्केटिंग’चा फंडा !

Next

चाफळ : येथील ग्रामपंचायतीची शनिवारी विशेष ग्रामसभा झाली. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत महिलांचे प्रश्न जाणून घेणे व त्यावर निर्णय घेणे अपेक्षित होते; पण ग्रामसभेत चक्क मार्केटिंगवाल्यांना आवतण दिलं गेलं. एका खासगी कंपनीच्या दलालाने ग्रामसभेत कंपनीविषयी माहिती देऊन ग्रामसभाच ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. महिला सरपंचांनी त्याबाबत विचारणा केली असता, दलालाने त्यांनाच दमबाजी केली.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ ग्रामपंचायतीच्या वतीने येथील मारुती मंदिरात महिलांच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संध्याराणी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेस जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ, उपसरपंच अंकुश जमदाडे, ग्रामविकास अधिकारी सतीश माने, ग्रामपंचायत सदस्या अलका पाटील, अनिता चव्हाण, रेखा पवार, शोभा पाटील, सुनीता पवार, उज्ज्वला वाघमारे, कांचन शेटे, छाया गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी सतीश माने यांनी सभेच्या मूळ उद्देशाविषयी माहिती दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक एका नामवंत कंपनीचे तिघेजण एका आलिशान कारमधून त्याठिकाणी आले. शासकीय अधिकारी ग्रामसभेला आले असावेत, असा सर्वांचा समज झाला; पण ते तिघेजण एका खासगी कंपनीचे दलाल असल्याची माहिती काहीवेळातच ग्रामस्थांना मिळाली. ग्रामसभेत महिला बोलत असतानाच सरपंच पाटील यांची परवानगी घेऊन संबंधित तिघांपैकी एका दलालाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करीत भाषणास सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच तो दलाल त्याच्या कंपनीची माहिती उपस्थितांना देऊ लागला. सर्व भाषणात त्याने फक्त त्याच्या कंपनीविषयीच महिलांना प्रबोधन केले. काहीही संबंध नसताना उपस्थितांना त्या कंपनीचा उदोउदो ऐकावा लागला.
वास्तविक, महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष ग्रामसभेत महिलांना प्रश्न मांडायचे होते. मात्र, या मार्केटिंंगच्या फंड्यात सर्व काही राहून गेले. कंपनीच्या विषयावरच सभेचा शेवट झाल्याने महिलांना निराश होऊन तेथून परतावे लागले. ग्रामसभेत प्रश्न मांडता न आल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
या प्रकाराची जाणीव झाल्यानंतर सरपंच संध्याराणी पाटील यांनी संबंधित कंपनीच्या दलालांना धारेवर धरले. ‘तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून व शासनाची योजना असल्याचे भासवून ग्रामसभेत बोलायला परवानगी मागितली होती. आमची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही जी माहिती दिली, ती शासकीय योजना नाही. तुम्ही खासगी कंपनीची माहिती ग्रामसभेत देऊन ग्रामपंचायती फसवणूक का केली,’ असा प्रश्न सरपंच पाटील यांनी विचारला. त्यावेळी संबंधित दलालाने ‘मी पाटण तालुक्यातील एका संघटनेचा संघटक असून याबाबत तुम्ही आमच्या साहेबांशी बोला,’ असे म्हणत सरपंचांचीच उलट तपासणी घेतली.
चाफळसारख्या संवेदनशील ग्रामपंचायतीकडून असे प्रकार घडणार असतील तर इतर ग्रामपंचायतींनी काय आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपन्यांकडून होणारी फसवणूक लक्षात घेता, दलालांपासून ग्रामपंचायतीने सावधगिरी बाळगणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीने चक्क ग्रामसभेतच कंपनीच्या दलालांना आवतण दिल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
जि. प. सदस्यांचा काढता पाय
चाफळ ग्रामपंचायतीत झालेला हा मार्केटिंगचा फंडा निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. ग्रामपंचायतीने शासनाचे नियम धाब्यावर बसवून चक्क एका खासगी कंपनीच्या मार्केटिंंगसाठी ग्रामसभेचा वापर केल्याने सभेचा मूळ उद्देशच बाजूला राहिला आहे.

Web Title: 'Marketing' fund in women's Gram Sabha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.