मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सातारा शहरातील बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 07:27 PM2017-12-14T19:27:39+5:302017-12-14T19:32:45+5:30
सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले. सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती.
सातारा : मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी बाजारपेठ गर्दीने फुलली होती. लक्ष्मीची आराधना केल्यानंतर महालक्ष्मीची पुस्तके देऊन महिलांनी या व्रताचे उद्यापन केले.
सातारा शहरातील बाजारपेठ मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारसाठी सजली होती. भल्या सकाळीच बाजारात पाच फळे, हार, फुले यासह पुस्तके घेऊन बसणाऱ्या विक्रेत्यांनी अवघा राजपथ झाकोळून गेला होता. मोती चौक ते गोलबाग या परिसरात विक्रेत्यांची मोठी गर्दी होती.
याबरोबरच राजवाडा, मंगळवार तळे रस्त्यावरही जागा मिळेल तिथे बसून व्यापाऱ्यांनी पूजेसाठी आवश्यक वस्तूंची विक्री केली. घरातील कामे आवरून पूजेचे साहित्य आणण्यासाठी आलेल्या महिलांचा वेळ वाचावा म्हणून काही व्यावसायिकांनी पाच फळे, हार, फुले आणि पुस्तकं असं सगळं एकत्रच विक्रीसाठी ठेवले होते. याची किंमत अधिकची असली तरी पायपीट न करता एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्यामुळे महिलांनी या खरेदीला पसंती दिली.
शाळेच्या आधी व्यवसायाचे धडे
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणून ग्राहकांचा ओढा वाढता असणार याचा अंदाज घेऊन यावेळी व्यावसायिकांनी आपल्या घरातील माणसांनाही मदतीसाठी सोबत घेतले होते. स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकाला इच्छित माल देण्याचे काम या घरातील चिमुरड्यांचे होते. तर दिलेल्या मालाचा व्यवहार घरातील मोठे करीत होते. विशेष म्हणजे शाळेच्या गणवेशात उभे राहून ही मुलं घरातील व्यवसायात मदत करत होते. सकाळी अकरानंतर मात्र ही मुलं शाळेत गेली होती.