मार्ली घाट हत्याकांड : दुसऱ्या गुन्ह्यातही कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:22 PM2020-09-11T12:22:08+5:302020-09-11T12:25:36+5:30
जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये चौघांचे हत्याकांड करणाऱ्या योगेश निकम (वय ३८, रा. सोमर्डी-शेते, ता. जावळी) याला त्याच्या घराल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकार देण्यात आला आहे.
सातारा : जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये चौघांचे हत्याकांड करणाऱ्या योगेश निकम (वय ३८, रा. सोमर्डी-शेते, ता. जावळी) याला त्याच्या घराल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकार देण्यात आला आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे घरातल्यांनी एकप्रकारे त्याच्यावर बहिष्कारच टाकला आहे. त्यामुळे आता पोलिसांनाच त्याला वकील द्यावा लागणार आहे.
सांगली जिल्ह्यातील बामणोली दत्तनगर येथील तानाजी जाधव, मंदाकिनी जाधव या दाम्पत्यासह त्यांची मुले तुषार आणि विशाल या दोघांचा मार्ली घाटात निर्घृण खून झाला होता. या खूनप्रकरणी मेढा पोलिसांनी योगेश निकमला अटक केली. त्याच्यावर खुनाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आई-वडिलांच्या खुनात त्याला दोनवेळा पोलीस कोठडी वाढवून मिळाली. तर त्यांच्या मुलाच्या खूनप्रकरणात सध्या सोमवार, दि. १४ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी योगेशच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सुरूवातीला कोणी वकील मिळत नव्हते.
योगेशच्या घरातल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एका वकीलाने त्याचे वकीलपत्र घेतले आहे. मात्र, हे वकीलपत्र कायमस्वरूपी असेल की नाही, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. योगेशला वकील मिळाले नाहीत तर आम्हालाच त्याला वकील द्यावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.