विवाह नोंदणी झाली किचकट...
By admin | Published: February 9, 2015 09:16 PM2015-02-09T21:16:27+5:302015-02-10T00:27:17+5:30
साक्षीदारांसह पुरोहितांचा पुरावा : खर्चाबरोबर कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ
प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्य शासनाने सर्वच व्यवहार आॅनलाईन केल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात येणारे विविध दाखले मिळविणे सुलभ झाले आहे. यातीलच एक विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचा दाखला हवा असेल आणि त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसेल, तर ती नोंद करण्यासाठी मुंबई विवाह (वैदिक पद्धतीने संपन्न झालेले) कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करतानाच दमछाक होते.विवाह झाल्यानंतर त्याची रितसर नोंदणी ग्रामपंचायत कर्मचारी घेत असत. मात्र, सध्या संगणक युग आल्याने जेवढ्या जलद सुविधा मिळत आहेत, तेवढ्या एखाद्या नोंदीत चुका राहिल्यास अथवा नोंद देणे राहिल्यास वसूल केल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये आॅनलाईन सेवा सुरू झाल्याने २६ प्रकारचे दाखले देण्यात आले आहेत. यात जन्म, मृत्यू, दारिद्र्य रेषेखालील रहिवासी, अशा दाखल्यांचा समावेश आहे. यात नोंदणीचा दाखलाही आहे.आॅनलाईन नोंदणीची पद्धत सुरू झाल्यापासून ज्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज आहे व ज्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे नाहीत त्यांना आता आॅनलाईन नोंदी घेऊन ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देता येते. मात्र, यासाठी लागणारे पुरावे गोळा करताना नाकेनऊ येत आहेत.हे प्रमाणपत्र मिळविताना महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि नोंदणी विधेयक १९९८ अन्वये सर्व पुरावे द्यावे लागतात. मुंबई विवाह कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी वर व वधू दोहोंचेही शाळा सोडल्याचे दाखले, जन्म तारीख दाखले, रेशनकार्ड अथवा रहिवासी दाखला, लग्नपत्रिका ती नसेल, तर तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र देण्याबरोबर तीन साक्षीदार व पुरोहितांच्या वरील सर्व कागदपत्रांबरोबर १०० रुपयाचे कोर्ट फी तिकीट लावावे लागते. त्याशिवाय विलंब आकारही भरावा लागते.
हे सर्व करताना संबंधित व्यक्तीच्या अक्षरश: नाकेनऊ येते. पत्नीचे माहेरकडील नाव कमी करून पतीकडील नाव लावण्यासाठी अक्षरश: कागदपत्रे व साक्षीदार गोळा करताना ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी अवस्था होते. यासाठी विवाहनोंदणी व प्रमाणपत्रासाठी किमान कागदपत्रांची अट लागू असावी, अशी प्रतिक्रिया
व्यक्त होत आहे.
संगणकीय जगात एका प्रमाणपत्रासाठी आठ ते दहा पुरावे गोळा करून विवाहनोंदणी करताना अक्षरश: दमछाक होते. हे थांबवावे अथवा कमी कागदोपत्री पुरावे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून सुलभ सेवा हा उद्देश सफल होईल.
- सर्जेराव पाटील, कोपार्डे