Satara: विहिरीत चप्पल तरंगताना दिसली अन् कळले विवाहितेने आत्महत्या केली; चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:42 PM2024-03-02T12:42:00+5:302024-03-02T12:42:18+5:30
कऱ्हाड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटके, ता. कऱ्हाड येथील चौघांवर कऱ्हाड ग्रामीण ...
कऱ्हाड : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आटके, ता. कऱ्हाड येथील चौघांवर कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश नंदकुमार यादव (रा. भिलवडी स्टेशन, ता. पलुस) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
पती संदीप भगवान पाटील, सासरा भगवान पाटील, सासू पार्वती भगवान पाटील व नणंद दीपाली भगवान पाटील (सर्व रा. आटके, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर कोमल संदीप पाटील असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटके येथील संदीप पाटील याचा भिलवडी स्टेशन येथील कोमल हिच्याशी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी विवाह झाला होता.
विवाहानंतर दोन वर्षे सासरच्यांनी कोमलला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर त्यांनी कौटुंबिक कारणावरून तिला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण सुरू केली. जानेवारी २०२१ मध्ये तिच्याशी वाद घालून मारहाण केल्यामुळे कोमल माहेरी भिलवडी येथे गेली. त्यावेळी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील समुपदेशन कक्षात तक्रार नोंदवून पती संदीपसह इतरांना समज देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याकडून कोमलला त्रास दिला जात होता.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पती संदीप याने कोमलचा भाऊ आकाश याला फोन करून कोमल माहेरी आली आहे का, अशी विचारणा केली. तसेच ती घरात नसल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरचे नातेवाईक तातडीने आटके येथे आले. त्यावेळी एका विहिरीत चप्पल पाण्यावर तरंगताना दिसली. ग्रामस्थांना संशय आल्यामुळे त्यांनी विहिरीत शोध घेतला असता कोमलचा मृतदेह आढळून आला.
सासरच्यांनी दिलेल्या शारीरिक, मानसिक त्रासामुळे कोमलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आकाश यादव यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप तपास करीत आहेत.