विवाहिता आत्महत्याप्रकरणी पतीसह तिघांना सक्तमजुरी
By admin | Published: February 8, 2017 10:50 PM2017-02-08T22:50:12+5:302017-02-08T22:50:12+5:30
एका वर्षात खटल्याचा निकाल; इंगळेवाडीतील घटना
सातारा : शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी पती व दीर यांना पाच तर सासऱ्याला दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पती नितीन चंद्रकांत घोरपडे (वय ३६), दीर दीपक चंद्रकांत घोरपडे (२८) व सासरा चंद्रकांत घोरपडे (७२, रा. इंगळेवाडी, नुने, ता. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
इंगळेवाडी येथे ७ जानेवारी २०१६ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास सावित्रा नितीन घोरपडे (वय ३०) हिने घरासमोर अंगावरॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सावित्रीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. तत्पूर्वी तिने पोलिसांना मृत्युपूर्व जबाब दिला होता. ‘लग्नात हुंडा दिला नाही, काम येत नाही, कामाला बाहेर जात नाही,’ या कारणावरून मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास दिला होता. त्या त्रासाला कंटाळून पेटवून घेतल्याचे तिने जबाबात म्हटले होते.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात पती, सासरा आणि दिरावर गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक हेमंत साठे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्रा' मानून न्यायालयाने पती, सासरा आणि दिराला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील आशीर्वाद कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)