विवाहितेला विषारी औषध पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:47 AM2021-07-07T04:47:55+5:302021-07-07T04:47:55+5:30
कऱ्हाड : विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा धक्कादायक प्रकार कालेटेक (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी पहाटे घडला. याबाबत ...
कऱ्हाड : विवाहितेला मारहाण करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा धक्कादायक प्रकार कालेटेक (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी पहाटे घडला. याबाबत हिना सर्फराज शेख (वय २५, रा. कालेटेक) यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिना यांचा २०१५ साली कालेटेक येथील सर्फराज शेख याच्याशी विवाह झाला आहे. एक वर्षापूर्वी भांडणामुळे हिना या मुलीसह माहेरी राहायला गेल्या होत्या. दि. ४ जुलै रोजी त्यांना पती सर्फराज यांचा फोन आला. आपण स्वतंत्र राहू, असे म्हणत समजूत काढली. त्यामुळे हिना भावासह कालेटेक येथे सासरी आल्या. हिना यांना सोडून भाऊ परत सातारला गेला. दरम्यान, रात्री पुन्हा सासरच्या लोकांनी हिना यांच्याशी वाद घातला. सासू व पतीने मारहाण करायला सुरूवात केली. तुला इथे राहायचे असेल तर आमच्या मनाप्रमाणे राहावे लागेल, असे म्हणत त्यांंनी हिना यांना पकडून नाक दाबत विषारी औषध पाजले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यावेळी हिना यांना घराच्या बाहेर ढकलून देत शिवीगाळ करण्यात आली. हिना यांनी तत्काळ पोलीस स्थानकात फोन करून घडलेला प्रकार सांगितला. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव यांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी शेख यांच्या घराकडे येत अन्य नातेवाईकांच्या मदतीने रूग्णवाहिका बोलवून हिना यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हिना यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी सासू, पतीसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे.