मंगल कार्यालयाला पंचवीस अन् लग्न मालकाला दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:41+5:302021-04-02T04:41:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हाधिकारी, सातारा यांचा आदेश न पाळता लग्न समारंभाला गर्दी केल्याप्रकरणी संबंधित यजमानांना दहा हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हाधिकारी, सातारा यांचा आदेश न पाळता लग्न समारंभाला गर्दी केल्याप्रकरणी संबंधित यजमानांना दहा हजार रुपये तर करंजे येथील प्रमिला मंगल कार्यालयाच्या मालकाला पंचवीस हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई शाहूपुरी पोलीस व सातारा पालिका यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरालगतच्या करंजे येथील प्रमिला मंगल कार्यालयामध्ये जर्नादन आण्णा भिसे व राजू गायकवाड यांच्या नात्यातील विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लग्न समारंभासाठी केवळ पन्नास जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली असताना या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करण्यात आला. याप्रकरणी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना माहिती मिळाल्यानंतर ते कर्मचाऱ्यांसह कार्यालयात आले. त्यानंतर दंडात्मक पावतीचे अधिकार पालिकेला असल्याने सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून यजमानांना दहा हजारांचा तर मंगल कार्यालय मालकाला पंचवीस हजारांचा दंड केला.