शहीद पित्याच्या नशिबी नव्हता ‘जय’चा वाढदिवस

By Admin | Published: September 19, 2016 11:04 PM2016-09-19T23:04:35+5:302016-09-20T00:10:29+5:30

गावातील वीस जवान लष्करात : ‘जाशी’नं जपलीय देशरक्षणाची परंपरा; चंद्रकांत गलंडे यांच्या जाण्यानं गावावर शोककळा--मु. पो. जाशी

The martyr did not have the luck of the father, Jay's birthday | शहीद पित्याच्या नशिबी नव्हता ‘जय’चा वाढदिवस

शहीद पित्याच्या नशिबी नव्हता ‘जय’चा वाढदिवस

googlenewsNext

शरद देवकुळे -- पळशी --माण तालुक्यातील जाशी येथील तब्बल वीस जवान देशाचं रक्षण करत आहेत. याच गावातील लान्स नाईक चंद्रकांत गलंडे हे रविवारी शहीद झाले. चंद्रकांत गलंडे हे काही महिन्यांपूर्वी गावी सुटीवर आले होते. यावेळी ‘डिसेंबरमध्ये मुलगा जयच्या वाढदिवसासाठी गावी पुन्हा येणार आहे,’ असा शब्द त्यांनी कुटुंबीयांना दिला होता. परंतु, जयचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य या पित्याच्या नशिबातच नव्हते, अशा भावना नातेवाईक व्यक्त होत आहेत.
माण तालुक्यातील जाशी या छोट्याशा गावातून तब्बल वीस सुपुत्र देशसेवेत भरती झाले आहेत. त्यामध्ये चंद्रकांत यांचे मोठे बंधू मंज्याबापू गलंडे, लहान भाऊ केशव गलंडे, विकास चोरमले, संतोष गलंडे, धनाजी बळीप, प्रल्हाद बळीप, छगन साळुंखे, श्रीमंत साळुंखे, केशव साळुंखे, मनोहर पवार, दीपक रूपनवर, पोपट बळीप, रामचंद्र पवार, ज्ञानदेव लवटे, पोपट खाडे, प्रकाश पवार, अंकुश गलंडे, प्रमोद ओंबासे यांचा समावेश आहे.
चंद्रकांत शंकर गलंडे हेही शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचली आणि गाव शोकसागरात बुडाला. तेव्हा साऱ्यांचीच पावले त्यांच्या घराकडे वळली.
गावालगतच्या शेतात चंद्रकांत गलंडे यांची स्वतंत्र वस्ती असून, तिथे चंद्रकांत यांचे वडील शंकर, आई सुलाबाई, पत्नी निशा, चार वर्षांचा मुलगा श्रेयस तर नऊ महिन्यांचा जय असे कुटुंब राहते.
माण तालुक्यातील अधिकारी अन् पदाधिकारी गावात पोहोचले असून, पार्थिव पुण्याहून तालुक्यात आणले जाणार आहे.
चंद्रकांत गलंडे यांचे शालेय शिक्षण पळशी येथील हनुमान विद्यालयात झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. वस्तीपासून शाळेचे अंतर चार किलोमीटर आहे. शाळेला एसटीने किंवा खासगी वाहनाने जाणे परवडत नसल्याने चंद्रकांत गलंडे हे शाळेला नेहमी चालत जात असत.
पोलिस दलात नोकरी करण्याची चंद्रकांत गलंडे यांची इच्छा होती. परंतु २००४ मध्ये ते लष्करात भरती झाले. ते आसाम व जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करत होते. त्यांचा मोठा भाऊ मंजाबापू हे पंजाब तर दोन नंबरचा भाऊ केशव जम्मूत कार्यरत आहेत. चंद्रकांत यांचे लग्न २१ नोव्हेंबर २०११ रोजी झाले.
काश्मीर खोऱ्यात लान्स नायक चंद्रकांत गलंडे शहीद झाल्याची बातमी सोमवारी सकाळीच समजली. पार्थिव मंगळवारी सकाळी येणार असून, या लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्याची आस संपूर्ण माण तालुक्याबरोबरच सातारा जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. तहसीलदार सुरेखा माने यांनी गावाला भेट देऊन तयारीची पाहणी केली. पार्थिव गावात ज्या मार्गावरुन येणार आहे. त्या रस्त्यावरील बाभळीचे झाडे काढण्याच्या सूचना केल्या. तसेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असलेल्या ठिकाणाचीही स्वच्छता करण्यात आली.


गलंडे कुटुंबीयांची माण तालुक्यात दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यामुळे शंकर गलंडे यांची तिन्ही मुलं सैन्यात दाखल झाली. चंद्रकांत गलंडे त्यापैकी सर्वात लहान. तिन्ही मुलं सैन्यात नोकरीला लागल्याने गलंडे कुटुंबाला काहीसे बरे दिवस येऊ लागले होते. चंद्रकांत गलंडे यांना दोन मुलं. अडीच वर्षांचा श्रेयस आणि दहा महिन्यांचा जय. जयच्या पहिल्या वाढदिवसाला चंद्रकांत घरी येणार होते; परंतु नियतीला यापैकी काहीच मान्य नव्हते.


तहसीलदारांकडून सांत्वन
घटनेची माहिती समजताच माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांनी जाशीला भेट देऊन गलंडे कुटुंबीयाचे सांत्वन केले. तसेच पार्थिव येणार असलेल्या मार्गाची पाहणी केली. तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांनी गलंडे कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

फोनवरुन चंद्रकांत असायचे कुटुंबीयांच्या संपर्कात
चंद्रकांत हे दोनच महिन्यांपूर्वी दोन महिन्यांच्या सुटीवर आले होते. दोन महिन्यांची सुटी संपवून जाताना ‘१५ डिसेंबरला जयच्या वाढदिवसाला नक्की येईल,’ असे ते कुटुंबीयांना सांगून गेले होते. ते फोनवरून कुटुंबीयांच्या संपर्कात असायचे,’ असे चंद्रकांतचे वडील शंकर यांनी सांगितले.



पत्नीला
धक्का असह्य
चंद्रकांत गलंडे यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्यावर उपचार करावे लागले.
रोजगार हमीवरही काम
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने २००३ च्या दुष्काळात चंद्र्रकांतने रोजगार हमीवर काम केले होते. सुटीवर आल्यानंतर आवडीने ते शेतात काम करत. कुटुंबीयांना हातभार लावत असत.

बेंदूर सणाला थांबताच आले नाही...
जुलैमध्ये दोन महिन्यांच्या सुटीसाठी चंद्रकांत गावी आले होते; पण सुटी संपल्याने बेंदूर सण दोन दिवसांवर येऊन ठेपलेला तरी सणासाठी थांबता आले नाही. त्यामुळे त्यांना कुटुंबासमवेत सण साजरा करता आला नाही.
- सुलाबाई, आई

Web Title: The martyr did not have the luck of the father, Jay's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.