कऱ्हाडचे शहीद जवान संदीप सावंत अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:12 AM2020-01-04T04:12:41+5:302020-01-04T04:12:50+5:30
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अंत्ययात्रेला लोटला जनसागर; गावकऱ्यांना अश्रू अनावर
तांबवे (जि. सातारा) : ‘शहीद जवान अमर रहे... वंदे मातरम्... भारत माता की जय,’ अशा घोषणा देत शुक्रवारी मुंढे (ता. कºहाड) येथे
शहीद जवान संदीप सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कºहाडात आणण्यात आले. शहरातील विजय दिवस चौकातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुंढे येथील निवासस्थानी पार्थिव पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला. उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. हजारोंनी आपल्या लाडक्या वीर जवानाला मानवंदना दिली. मोठे बंधू सागर यांनी संदीप यांच्या तीन महिन्यांच्या रिया या चिमुकलीला तळहातावर घेऊन चौथºयावर नेले. सैन्यदलाने हवेत बंदुकीतून फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर पार्थिवाला भडाग्नी देण्यात आला.
आई, पत्नीचा हृदय पिळवटणारा आक्रोश
संदीप यांचे पार्थिव घरानजीक पोहोचल्यानंतर आई अनुसया व पत्नी सविता यांनी आक्रोश केला. पंधरा दिवसांपूर्वी ज्या मुलाला मिठीत घेऊन निरोप दिला त्या मुलाचे पार्थिव पाहिल्यानंतर आईने हंबरडा फोडला. मुलीच्या नामकरणासाठी आल्यानंतर ज्याच्यासोबत मुलीला घेऊन तिच्या जन्माचा आनंद साजरा केला ते पती त्या दिवशी अखेरचा निरोप घेऊन गेल्याच्या जाणिवेने पत्नी सविता यांनीही आक्रोश आवरता आला नाही.