मारुलला गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ९२ वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:55+5:302021-03-26T04:39:55+5:30
दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात चार दिवसांपासून तैनात असून सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी ...
दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात चार दिवसांपासून तैनात असून सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा साथरोग अधिकारी सुभाष औंधकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, विक्रमबाबा पाटणकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
मारुल तर्फ पाटण येथे चार दिवसांपासून ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. ही माहिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांना समजताच त्यांनी आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी उपकेंद्रात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. मंगळवारपर्यंत ८४ जणांना त्रास होत होता. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. बुधवारी आणखी आठजणांना त्रास झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या गावाचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, अशा सूचनाही गटविकास अधिकारी मीना साळुंखे व आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांनी केल्या आहेत.