हजार दिवसांपासून मासाळवाडी पावसाविना

By admin | Published: September 13, 2015 09:06 PM2015-09-13T21:06:47+5:302015-09-13T22:18:49+5:30

माण तालुका : जनावरांना सोलापूर जिल्ह्यातून चारा; तलाव कोरडा, मेंढीपालन तसेच दुग्ध व्यवसायही अडचणीत

Masalwadi does not rain for thousands of days | हजार दिवसांपासून मासाळवाडी पावसाविना

हजार दिवसांपासून मासाळवाडी पावसाविना

Next

सचिन मंगरूळे-म्हसवड --माण तालुक्यातील मासाळवाडीची ओळख आता अतिदुष्काळी गाव म्हणून झाली आहे. गत तीन वर्षांत या गावात कसलाच पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. तीन वर्षांपासून काहीच पिकले नसल्याने येथील बळीराजा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून चारा आणून जनावरे जगवत आहे. तसेच कुटुंबाचा आर्थिक आधार ठरलेला दुग्ध व्यवसायही अडचणीत आला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत जनावरे पुढे जगायची कशी? असा प्रश्न येथील बळीराजाला पडला आहे. तसेच येथील पाझर तलाव कोरडा पडल्यानेही शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. म्हसवड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर पूर्वेला मासाळवाडी गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे दोन हजारांच्या आसपास आहे. हे गाव म्हसवड नगरपालिका हद्दीत येते. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व मेंढीलपालन आहे. या ठिकाणी १९७२ सालच्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमीच्या माध्यमातून तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला होता. परंतु, गत तीन
वर्षांपासून या भागात पाऊस न झाल्याने तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. मासाळवाडी तलावाचे लाभक्षेत्र मासाळवाडीसह धुळदेव, मोटेवाडी, कारखेल, गाडेकरवस्ती असे आहे. येथील पाच-सहा हजार नागरिकांच्या जमिनी लाभक्षेत्रात येतात; परंतु सध्या हा तलाव कोरडा पडल्याने येथील बहुतांशी जमिनी पाण्याविना पडून आहेत. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावरही सुरू आहे. सध्या तालुक्यातील खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने चारा मिळणे मुश्कील झाले आहे. त्यातच दुधाचे दर घसरल्याने येथील बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.शेतीला जोडधंदा म्हणून येथील शेतकरी मेंढपाळ व्यवसाय करतात. दरवर्षी ते आपली मेंढरं मराठवाड्यातील लातूर, निलंगा, औसा, उस्मानाबाद, मुरूड, तेर, ढोकी, उदगीर या भागात घेऊन जातात. सध्या मराठवाड्यातही भीषण दुष्काळ पडला असल्याने यंदा मेंढरं कोठे चरायला घेऊन जायची हा प्रश्न मेंढपाळांना पडला आहे. सद्य:स्थितीत काही मेंढपाळ गावाकडे गेल्या दोन महिन्यांपूर्वीपासून आले आहेत. सध्या पाऊस नसल्याने चारा उगवला नाही. त्यामुळे मेंढरांना ओला चारा मिळत नसल्याने मेंढरं जगविण्यासाठी पेंड, गहू, बाजरी, मका विकत घेत आहेत. त्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढले असून लोकांना पावसाची प्रतीक्षा आहे.


जलसंधारणाच्या कामाची गरज...
सातारा-सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे मासाळवाडी गाव आहे. सोलापूर जिल्ह्याची सुरुवात पिलीव घाटातून होते. घाटापलीकडे सध्या पाऊस सुरू आहे. म्हसवड शहरात पाऊस सुरू आहे. परंतु मासाळवाडी परिसरात अद्याप पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे यापुढे जगायचे कसे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. म्हसवड पालिका हद्दीत येणारे गाव असून, येथे पालिकेच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी व विजेची सोय आहे. परंतु या गावात अद्याप दळणवळणाची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे आबालवृद्ध व शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यातच हे गाव पालिका क्षेत्रात येत असल्याने येथील नागरिकांना पंचायत समिती कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या माण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे या भागातही व्हावीत, अशी मागणी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ यांनी केली आहे.

सध्याच्या स्थितीत घरात चिमूटभर पीठ नाही, तर पोटाची खळगी व मेंढरांचं पोट कसं भरायचं. माय बाप सरकारने मुक्या जनावरांबरोबर मेंढरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा. तरच आम्हाला न्याय मिळल.
-भीमाबाई महादेव नरुटे
(मेंढपाळ महिला)
आम्ही काही महिनं मराठवाड्यातल्या लातूर भागात दरवर्षी मेंढरं चरायला घेऊन जातो; परंतु तिथंही यंदा दुष्काळ पडलाय. यंदा मेंढरं कुठं न्यायची. मुलांची शाळेची फी कशी भरायची, असा प्रश्न आहे. तरी शासनानं मेंढरांसाठी चारा द्यावा, तरंच आम्ही व आमची मेंढरं जगतील.
-पांडुरंग आबा नरूटे,
मेंढपाळ, मासाळवाडी

Web Title: Masalwadi does not rain for thousands of days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.