मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

By Admin | Published: February 18, 2016 11:13 PM2016-02-18T23:13:11+5:302016-02-19T00:20:41+5:30

शहीद सुनील सूर्यवंशी : मस्करवाडी-कुकुडवाडमधील नागरिकांचा सवाल ; कर्नाटक शासनाला जमलं, महाराष्ट्राला का नाही

Mascara's abandonment neglect! | मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

googlenewsNext

कुकुडवाड : मस्करवाडी (कुकुडवाड) येथील वीरजवान हुतात्मा सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. हुतात्मा सूर्यवंशी यांच्या देशप्रेमाला नतमस्तक होण्यासाठी प्रचंड जनशक्ती एकत्र झाली; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस घोषणा न झाल्याने शासनाची माया का बरं आटली? अशी संतप्त प्रतिक्रिया कुकुडवाड नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सियाचीन येथे हिमकडे कोसळून हुतात्मा झालेल्या वीरजवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी मस्करवाडीत आले. घडलेल्या घटनेनंतर पार्थिव प्रत्यक्षात गावी येण्याचा कालावधी व त्याद्वारे झालेले दु:ख कुटुंबीय व ग्रामस्थांसाठी पर्वताएवढे होते. अखेर वीरजवान सुनील यांचे पार्थिव गावी आले आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने सैन्य दलातील जवान तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मस्करवाडीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अंत्यविधी पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी आले अन् गेले. त्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा होईल, हे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री आले नाहीत आणि इतर अनेकजण आले आणि काही आर्थिक मदत जाहीर न करताच निघून गेले.वास्तविक पाहता सियाचीन येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या कर्नाटकचे सुपुत्र हणमंतअप्पा यांना सरकारने २५ लाख, एक भूखंड व कुटुंबातील एकाला शासनाची नोकरी देऊ केली. त्या तुलनेत हुतात्मा सुनीलच्या कुटुंबीयांच्या पदरात काय पडलं, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना कुकुडवाड येथे येण्यास जमले नसले तरी पालकमंत्र्यांनी तरी तशी घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे घडले नसल्याने कुटुंबीय व कुकुडवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)

इतरांवर अक्षरश: घोषणांचा पाऊस
सिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागतात. देशासाठी प्राण बलीदान करणाऱ्या निदड्या छातीच्या सुनिल सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची मात्र शासनाकडून उपेक्षाच झाली. सियाचीनमध्ये शहीद झालेल्या इतर जवानांना आपआपल्या राज्याने आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीच घोषणा जाहीर केली नाही. सूर्यवंशी कुटुंबीय आता उघड्यावर पडले असताना शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या मदतीशीवाय हे कुटुंब दुख: झेलत आहे.

Web Title: Mascara's abandonment neglect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.