मास्कने घालवली लिपस्टीकची लाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:30+5:302021-04-30T04:48:30+5:30
सातारा : कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडताना आवरून सावरून बाहेर पडण्याची महिलांना सवय असते. अलीकडे तर छोट्यातल्या छोट्या कामासाठी जातानाही ...
सातारा : कोणत्याही कारणांनी घराबाहेर पडताना आवरून सावरून बाहेर पडण्याची महिलांना सवय असते. अलीकडे तर छोट्यातल्या छोट्या कामासाठी जातानाही व्यवस्थित आवरून मगच घराबाहेर पाय ठेवला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळे महिलांना घरातच रहावे लागत असल्याने कॉस्मेटिक मार्केट शांत झाले आहे. मास्क घालणे बंधनकारक असले तरीही महिला लिपस्टीक लावूनच बाहेर पडत आहेत.
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच संचारबंदीवर प्रशासनाने बंधन आणले. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाही हे ठणकावून सांगितल्याने अनेकजण स्वत:च्या घरातच थांबू लागले. दारात येणारी भाजी घेणे आणि हौस मौजेला नियंत्रणात आणून अनेकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले. कोणत्याही कारणांनी घराबाहेर न पडणाऱ्या महिलांनी पार्लरमध्ये जाणेच टाळले आहे.
कोरोनाने महिलांच्या नटण्या-भेटण्यावर मर्यादा आणल्या आहेत. लॉकडाऊनमुळे नोकरी, व्यवसाय सगळे बंद असून २४ तास घरात बसून मग मेकअप करून जाणार कुठे. गेलोच तरी मास्क लावायचे बंधन असल्यामुळे केलेला मेकअप दिसत नसल्याने महिला सध्या घरात राहून घरगुती उपचारांनी सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कॉस्मेटिक वापरावर मर्यादा आल्या आहेत.
कोट :
घराबाहेर पडताना मास्क घालणे सक्तीचे आणि आवश्यकही आहे. पण मास्क घालून बोलणे इतके सोपे नाह. अशावेळी सुरक्षित अंतर ठेऊन मास्क काढून बोलावे लागते. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि लिपस्टीक दोन्हीही लावून मी बाहेर पडते.
- रेणू येळगावकर, सातारा
आपले आवरणे आणि नटणे हे आपल्या स्वत:साठी असते. घरात थांबायची वेळ आली म्हणून उगीचच गबाळं राहणे मला मान्य नाही. त्यामुळे इतर वेळी सारखेच मी मस्त आवरून घरात बसते. स्वत:चे सुंदर रूप आरशात पाहणे यासारखा आनंद नाही.
- मीना कोटक, सातारा
कोविड काळापासून पार्लरमध्ये थेट येणारे ग्राहक थांबले आहेत. लग्नाचे स्वरूप छोटे झाले तरी मात्र मेकअपची मात्र हौस पुरी करून घेत आहेत. सध्या आमची सर्व भिस्त लग्नकार्यांवर आहे. तिथे मात्र वधू-वरांच्या मेकअपबरोबरच करवला आणि करवली यांच्यासह कुटुंबीयांचा मेकओव्हर करण्याचेही काम मिळत आहे.
- प्रिया चव्हाण, मेकअप आर्टिस्ट, सातारा
त्वचेची निगराणी ठेवण्यासाठी नियममत काळजी घेणे आवश्यक असते. कोरोनाकाळात अनेकांना पार्लरमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या त्वचेचेच प्रश्न निर्माण होतात. तरी घरी राहून आपण त्वचेसाठी योग्य त्या प्रसाधनांचा वापर करून ती काळजी घेवू शकतो यासाठी आम्ही मात्र, फोनद्वारे त्यांना त्वचेविषयी तक्रारींवर उपाय सांगतो.
- डॉ. मृणालिनी कोळेकर, सातारा
लॉकडाऊनमुळे आम्हाला दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही व्हॉटसअॅपच्या स्टेटसवर उपलब्ध साहित्याची माहिती दिल्यानंतर ग्राहक याचे बुकिंग करतात. काही जणींना आवश्यक वस्तू ऑनलाईन पध्दतीने देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
- श्रुती चव्हाण, विक्रेता, सातारा
.......................