लोकमत रक्ताच नातं अभियानात पालिकेकडून भव्य रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:36+5:302021-07-08T04:25:36+5:30
कन्या सुरक्षा अभिमानाचा नववा वर्धापनदिन मलकापूरात गुरूवारी नगरपालिकेचे विविध कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूरः येथील नगरपालिकेच्या वतीने श्रीमती प्रेमलाताई ...
कन्या सुरक्षा अभिमानाचा नववा वर्धापनदिन
मलकापूरात गुरूवारी नगरपालिकेचे विविध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूरः
येथील नगरपालिकेच्या वतीने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार मोहनराव कदम यांच्या उपस्थितीत गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लोकमत रक्ताचं नातं अभियानात पालिकेकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, प्रांताधिकारी उत्तम दिघे, अजितराव पाटील, यशवंतराव मोहिते विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य सतीश माने, उपविभागीय तहसीलदार अमरदीप वाकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नगरपालिकेने विविध नावीन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. त्यामधील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान ही योजना ज्या मुली बाहेर शिक्षणासाठी जातात त्यांच्यासाठी वरदायिनी ठरली आहे. तसेच यावेळी प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेंतर्गत ठेवपावतींचे वितरण करण्यात येणार आहे. दिवंगत आनंदराव चव्हाण व दिवंगत प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लोकमत रक्ताचं नातं अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती शकुंतला शिंगण, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन सभापती प्रशांत चांदे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.
कोट
सर्वांच्या सहकार्याने मलकापूर पालिकेने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सातत्याने यशस्वी केले आहेत. लोकमत रक्ताचं नातं हे अभियान गरजूंना नवजीवन देणारे आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे.
नीलम येडगे
नगराध्यक्षा मलकापूर