साताऱ्यातील भीषण स्फोटप्रकरणी दोघांना अटक, पाच दिवस पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:02 PM2024-10-04T12:02:04+5:302024-10-04T12:02:24+5:30
स्फोटक पदार्थ जवळ बाळगल्याने कारवाई
सातारा : येथील माची पेठेत झालेल्या भीषण स्फोटप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. संबंधितांनी स्फोटक पदार्थ जवळ बाळगून दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण केला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
शाहीद हमीद पालकर (वय ३६), तबरेज गणी पालकर (वय ४२, रा. गुरूवार परज, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अदालत वाड्याशेजारी असणाऱ्या माची पेठेतील एका दुकानात बुधवार, दि. २ रोजी दुपारी दीड वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात मुजम्मील हमीद पालकर (वय ४२, रा. गुरूवार पेठ, सातारा) हे जागीच ठार झाले तर नमाजासाठी जाणारे बापलेक या स्फोटात गंभीर जखमी झाले.
या स्फोटानंतर पोलिस दलातील सर्व तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. फटाक्यांच्या दारूचा हा स्फोट असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. ज्यांनी हे स्फोटक पदार्थ आणले त्यांचा पोलिसांनी रात्री शोध घेतला. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी शाहीद पालकर आणि तबरेज पालकर या दोघांना अटक केली. त्यांची रात्रभर कसून चाैकशी करण्यात आली.
त्यानंतर गुरूवारी दुपारी त्यांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी स्फोटक पदार्थ नेमके आणले कोठून, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना घातक पदार्थ त्यांनी जवळ का बाळगले, यासंदर्भात पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. या प्रकरणाचा पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के हे अधिक तपास करत आहेत.
नमुने नागपूरला पाठवले
स्फोट झाल्यानंतर रात्री पुण्यातील एटीसीचे पथक साताऱ्यात आले. या पथकाने आणि सातारा पोलिसांनी घेतलेले घटनास्थळाचे नुमने नागपूर येथील फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच यातील आणखी वस्तूस्थिती समोर येणार आहे.