मसूरच्या पोलीस ठाण्यामुळे कायदा सुव्यवस्था राहणार : जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:41+5:302021-04-24T04:39:41+5:30
मसूर : मसूर येथे पोलीस ठाण्यासाठी आपण अनेक वर्षे पाठपुरावा करीत होतो. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यामुळे मंजूर झाले आहे. ...
मसूर : मसूर येथे पोलीस ठाण्यासाठी आपण अनेक वर्षे पाठपुरावा करीत होतो. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यामुळे मंजूर झाले आहे. यामुळे परिसरातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे, असा विश्वास जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले. मसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सह्याद्री कारखान्याचे संचालक लहुराज जाधव, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, माजी सरपंच प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, प्रा. कादर पिरजादे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, सिकंदर शेख, विकास पाटोळे, कासम पटेल उपस्थित होते.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘मसूर परिसरात सह्याद्री साखर कारखान्याकडे प्रतिवर्षी परजिल्ह्यातील सुमारे सात ते आठ हजार लोक येत असतात. शामगाव घाट, रेल्वे स्टेशन, कृष्णा नदी परिसर अशी मोठी व्याप्ती आहे. मसूरचा क्राईम रेट जास्त असल्याने येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी दिवंगत आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असताना उंब्रजचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक हरीश खेडकर यांनी मसूरला स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे असा प्रस्ताव जिल्हा पोलीसप्रमुख मीरा बोरवणकर यांच्याकडे दिला होता. तेव्हापासून आपण सतत प्रयत्न करीत होतो.’
जगदाळे म्हणाले, ‘मसूर पोलीस ठाण्याला सद्य:स्थितीत कार्यान्वित करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक १, पोलीस शिपाई ३, पोलीस मुख्यालय/इतर पोलीस ठाणेकडील १, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक ३, पोलीस हवालदार ३, पोलीस नाईक ५, पोलीस शिपाई १४ अशा तीस पदास मान्यता मिळाली आहे. त्याची चार दिवसांत पूर्तता करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्स्ल यांनी दिले आहे. पोलीस ठाण्याला पाच एकर जागा दिली आहे. त्या ठिकाणी पोलिसांना राहण्यासाठी सर्वसोयीनिशी क्वार्टर निर्माण कराव्यात. मसूर पोलीस दूरक्षेत्राचे नाव बदलावे.’
प्रा. पिरजादे म्हणाले, ‘मसूरच्या जवळच सांगली जिल्ह्याची हद्द आहे. शामगाव खिंड, नदीकाठच्या भागात होणारी वाळू तस्करी, कारखाना यामुळे जास्त गुन्हे घडत होते. त्यावेळी मसूर पोलीस दूरक्षेत्राला पेट्रोलिंगसाठी वाहन मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार गस्तीचे वाहन मिळाले आहे.’