तुल्यबळ पॅनेलमध्ये रंगणार सामना
By admin | Published: May 18, 2016 10:36 PM2016-05-18T22:36:32+5:302016-05-19T00:11:47+5:30
१७ जणांची माघार : भागधारक-परिवर्तनचे उमेदवार जाहीर
सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. अपात्रतेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पात्र ठरलेले निशांत पाटील, वसंत लेवे यांना सत्ताधारी भागधारक पॅनेलने आपल्याकडे खेचत उमेदवारी दिली, तर परिवर्तन पॅनेलतर्फे तुल्यबळ पॅनेलचे आव्हान उभे करून विरोधाची चुणूक दाखवून दिली.
साताऱ्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या जनता सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे सर्व दोर आता कापले गेलेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची बुधवारी अंतिम मुदत होती. त्याप्रमाणे कोणी अर्ज माघारी घेतले आणि अंतिम उमेदवारी कोणाची कायम राहिली, यांसह उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्याची प्रक्रिया आज, गुरुवार सकाळी जाहीर करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांसह इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. अंतिम क्षणी कोणी उमेदवारी काढून घेतली? कोणाचा पत्ता कापला आणि कोणाची जागा अबाधित राहिली? या प्रश्नांची उत्तरे गुरुवारी मिळणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी १७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले; परंतु त्यांची यादी अधिकृतरीत्या गुरुवारी प्रसिद्ध करणार असल्याचे स्पष्ट केले. ९७ व्या घटना दुरुस्तीचा या निवडणुकीच्या निमित्ताने उच्च न्यायालयापर्यंत चांगलाच कीस निघाला. उपनिबंधकांनी अवैध ठरविलेले १४ उमेदवार उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर विरोधकांमध्ये बळ संचारले; मात्र सत्ताधाऱ्यांनी वसंत लेवे व निशांत पाटील यांना आपल्याकडे खेचून नवी खेळी खेळली आहे.
बँकेत अपक्षांचा एकांगी लढा
जनता बँकेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवारी संपली. १७ जणांनी उमेदवारी अर्ज काढल्याने ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सत्ताधारी भागधारक व परिवर्तन या दोन्ही पॅनेलकडे प्रत्येकी २१ उमेदवारांची यादी तयार आहे. मात्र, प्रशांत पन्हाळकर यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.