जुन्यांचा मेळ...नव्यांची जुळणी, अन्यथा मतदारसंघाची फाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:47+5:302021-01-20T04:37:47+5:30
(ग्रामपंचायतींनी घडविला सत्ताबदल की मतदारांनी घडविला सत्ताबदल ?????????) लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की नेतेमंडळी फारसे ...
(ग्रामपंचायतींनी घडविला सत्ताबदल की मतदारांनी घडविला सत्ताबदल ?????????)
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की नेतेमंडळी फारसे लक्ष देत नाहीत. एकाच ग्रामपंचायतीत नेत्यांचेच दोन गट असतात. त्यामुळे सुरुवातीला ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या प्रयत्न असतो; पण नाही झाली तर पुन्हा दोन्ही कार्यकर्ते आपलेच असल्याने त्यांनी दुखाविण्याचा प्रयत्न होत नाही. यावेळी मात्र नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलेच लक्ष घातले. अनेकांना ग्रामपंचायतीत फटका बसला, काहींनी ग्रामपंचायती आपल्याकडेच राखल्या तर काहींनी गमावल्या; पण, ग्रामपंचायतींना कमी लेखून चालणार नाही हे आता नेत्यांच्या चांगलेच लक्षात आले आहे.
नेत्यांनी जुन्यांच्या मेळ घालत नव्यांचीही मोट बांधली त्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पण ज्या ठिकाणी हे शक्य झाले नाही त्या ठिकाणी निवडून येईल तो आपलाच म्हणत निवडणूक लागली. निवडणूक झाली, पॅनल निवडून आले; पण आता विरोधी पॅनलमधील निवडून आलेले उमेदवार नेत्यांकडे जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. ते आपला सवता सुभा करण्याच्या तयारीत आहेत. नेत्यांनी अधिक लक्ष दिले असते तर निवडणूक बिनविरोध झाली असती असे त्यांचे मत आहे. ज्या आमदारांनी ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घातले त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोरेगावमध्ये हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांना ताकद देऊन, काही ठिकाणी तडजोडी करून, विकासकामांचे आश्वासन देऊन ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. तर ज्या ठिकाणी बिनविरोध करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी पॅनल टाकून आपलाच प्रभाव कसा अधिक आहे हे दाखवून दिले. या ठिकाणी शशिकांत शिंदे ग्रामपंचायत पातळीवर उतरले नाहीत. तशी त्यांच्याकडून अपेक्षाही नव्हती. कारण, आत्तापर्यंत सर्वच नेते ग्रामपंचायतींना गृहीत धरत आले आहेत. पण, यापुढे असे होणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले नाही तर पुढील काळात एक एक ग्रामपंचायत हातातून जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याबरोबरच विरोधी गट सबळ होण्याचाही धोका आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये गावे सांभाळताना दोन पिढ्यांमध्येही समन्वय साधण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा होणारी फाटाफूट नेत्यांना अडचणीची ठरण्याची मोठी शक्यता आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दुसरा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे ज्या ग्रामपंचायतींवर आत्तापर्यंत प्रस्थापितांची सत्ता होती. त्यांना लोकांनी बाजूला केले आहे. आता हे काही कालावधीसाठी बाजूला केलेले आहे की कायमचे हे येणारी पुढील परिस्थितीच ठरवेल. पाटण तालुक्यातील पाल ग्रामपंचायतीमध्ये धक्कादायक सत्तांतर झाले. अनेक वर्षे गावाला विकासाच्या प्रवाहात ठेवणाऱ्या देवराज पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मनोज घोरपडे यांचा या गटातील प्रवेश हा पुढील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची बांधणी आहे. त्यामुळे हे नक्कीच चिंताजनक आहे.
मंत्री बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या ताब्यातील ग्रामपंचायती आपल्याकडेच राखण्यात यश मिळविले. तर नव्याने महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, प्रभाकर देशमुख यांनी नव्याने बांधणी करत ग्रामपंचायतीमध्ये वेगळी व्यूहरचना केली आहे. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले आहे.
चौकट
ग्रामपंचायती भविष्यातील सत्ताकेंद्र
ग्रामपंचायती या भविष्यातील सत्ताकेंद्रे ठरणार आहेत. याबाबतची जाणीव ठेवून सर्वांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नवीन नेतृत्वही याच ठिकाणाहून तयार होणार आहे. ते प्रस्थापितांच्या सोबत जाणार की विरोधात बसणार यावरच नेत्यांचीही गणिते अवलंबून असणार आहेत. त्यामुळे नेत्यांना काही प्रमाणात काळजी घ्यावी लागेल. केवळ ग्रामपंचायतीतील दोन्ही गट आपले असे म्हणून चालणार नाही. कारण आता हे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. भविष्यात विधानसभेला महाविकास आघाडी झाली तरी ग्रामपंचायतीत तुटलेली मने सांधता येत नाहीत. त्यांच्यातील वाद हे खूप काळ चालू राहतात. यासाठी आता नेत्यांनाही ग्रामपंचायत सहज घेऊन चालणार नाही.