Satara: नायगाव येथे धरणात बुडून मावस आजोबा-नातवाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:05 AM2024-05-13T11:05:18+5:302024-05-13T11:05:47+5:30
मृत पुणे येथील : यात्रेसाठी नातेवाइकांकडे आले अन् जीवाला मुकले
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नायगाव लघु व पाटबंधारे विभागाच्या धरण क्रं. २ मध्ये पोहायला गेलेल्या मावस आजोबा-नातवाचा बुडून मृत्यू झाला. प्रशांत शाम थिटे (वय ४६, रा. लक्ष्मीनगर, पार्वती, पुणे), रुद्र प्रशांत चव्हाण (वय ७, रा. जांभूळवाडी, कात्रज, पुणे जि. पुणे सध्या रा. कामथडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या मावस आजोबा-नातवांचे नाव आहे.
खंडाळा तालुक्यातील नायगावची ग्रामदैवताची वार्षिक यात्रा असल्याने नातेवाइकांकडे रुद्र प्रशांत चव्हाण आणि प्रशांत शाम थिटे हे आले होते. मावस आजोबा प्रशांत थिटे हे घरातील रुद्र चव्हाण याच्यासह चार लहानग्यांना घेऊन दुचाकीवरून पोहण्यासाठी धरणावर गेले असता त्या ठिकाणी रुद्र हा धरणाच्या पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने रुद्र बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी प्रशांत थिटे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यामध्ये बुडाले. त्या ठिकाणी पोहण्याकरिता सोबत आलेल्या तीन लहान मुलांनी आरडाओरडा केला. मात्र, कडक उन्हाचा तडाखा असल्याने जवळपास कोणीच नव्हते. संबंधितांनी घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतर पळत येत घडलेली घटना नायगाव येथे असलेल्या घरातील नातेवाइकांना सांगितली.
यादरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नयना कामथे यांची टीम तसेच शिरवळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी, कन्हेरी येथील गणेश पवार याने धाडस दाखवीत बुडालेल्या प्रशांत थिटे व रुद्र चव्हाण यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यांना शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेचा पोलिस अंमलदार राजेंद्र फरांदे, अजित बोऱ्हाटे हे अधिक तपास करीत आहेत.
तब्बल साडेपाच तास तणावाची स्थिती
नायगाव, ता. खंडाळा येथील धरणामध्ये लहानग्यासह दोन जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली असता नातेवाइकांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात गर्दी केली. यावेळी मृत लहानगा रुद्र चव्हाण याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी केलेल्या आक्रोशामुळे मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिरवळ पोलिसांनी व नातेवाइकांनी संबंधितांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. यावेळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.