आरक्षण सोडत समीकरण सोडविणार सत्तेचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:38+5:302021-01-19T04:39:38+5:30
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील विविध ग्रामपंचायतींसाठी एकाच राजकीय पक्षांच्या दोन गटांत, दोन विरुद्ध राजकीय पक्षांच्या गटात ...
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील विविध ग्रामपंचायतींसाठी एकाच राजकीय पक्षांच्या दोन गटांत, दोन विरुद्ध राजकीय पक्षांच्या गटात व स्थानिक आघाड्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी स्थानिक प्रश्नांशी निगडित काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरपंचपद आरक्षण सोडतीनंतर बदलणारी परिस्थिती ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात, वर्चस्वाच्या लढाईत महत्त्वाची ठरणार आहे.
तालुक्यातील अगदी उत्तरेकडील असलेल्या व राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या सोळशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब सोळस्कर गटाने प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या संतोष सोळस्कर गटावर ६-३ असा विजय मिळवत ग्रामपंचायतमधील आपली सत्ता कायम राखली आहे, तर नांदवळ येथे राष्ट्रवादीच्या दोन गटांत झालेल्या निवडणुकीत भूषण पवार यांच्या गटाने ५-४ असा विजय मिळविला. चौधरवाडी (ता. कोरेगाव) येथे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरुद्ध असलेल्या तानाजी शिंदे गटाचा राष्ट्रवादीच्या हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या गटाने ५-२ असे बहुमत घेत ग्रामपंचायत सत्तेचे सत्तांतर घडवून आणले.
दरम्यान, सोमवारी जाहीर झालेल्या निकालाने संबंधित ग्रामपंचायतीमधील वर्चस्वाचे चित्र काहीसे स्पष्ट झाले असले, तरी ग्रामपंचायतीच्या सत्तेचे अंतिम गणित सोडविण्यासाठी सरपंचपद आरक्षण सोडतीच्या समीकरणावर शिलेदारांना विसंबून राहावे लागणार आहे.