माथाडी नेते म्हणतात, हे तर धर्मसंकट! : घडतंय-बिघडतंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:01 PM2019-03-25T22:01:48+5:302019-03-25T22:02:52+5:30
रविवारी कºहाडात राष्ट्रवादीचा प्रचार प्रारंभ दणक्यात झाला. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका हॉटेलात उतरले होते. एका खोलीत थोरल्या
प्रमोद सुकरे /कºहाड : रविवारी कºहाडात राष्ट्रवादीचा प्रचार प्रारंभ दणक्यात झाला. कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका हॉटेलात उतरले होते. एका खोलीत थोरल्या पवारांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांखेरीज काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी बसले होते. त्याचवेळी शेजारच्या खोलीत माथाडीचे तीन नेते एकत्र आले अन् ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी धर्मसंकटच असल्याची चर्चा सुरू झाली.
माजी मंत्री असणाऱ्या एका नेत्याने या विषयाला सुरुवात केली. पूर्वाश्रमी सेनेच्या असणाऱ्या नेत्याला बघत ते म्हणाले, ‘तुम्ही आलात खूप बरं वाटलं!’ अन् हशा पिकला, असो.
माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले, ‘खंर तर हा मतदारसंघ भाजपला मिळत नाही म्हटल्यावर तरी नरेंद्र पाटलांनी थांबायला हवं होते; पण गडी थांबायला तयार नाही. परवा आम्ही माथाडी संघटनेत मात्र संघटनेची वाटचाल वेगळी पण प्रत्येकाची राजकीय वाटचाल स्वतंत्र राहील, हे निश्चित करून घेतलंय. साताºयात तर मलाच प्रचारात पुढाकर घ्यावा लागणार! काय करायचं? हा प्रश्नच आहे.’
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘मागच्या महिन्यात मित्र जेवायला घरी आला; पण असा काही लढण्याचा निर्णय घेईल, असं वाटत नव्हतं. मला तर याबाबत काहीच बोलला नाही. आता अडचण तर होणारच!’ या दोघांचे संभाषण झाल्यावर जिल्हा परिषदेचे सदस्य असणारे रमेश पाटील म्हणाले, ‘तुमचं काहीच नाही हो...पण माझा तर सख्खा भाऊ आहे तो. माझी किती मोठी अडचण आहे, ती समजून घ्या,’ असे म्हणताच दुसरे दोघे काही मिनिटं स्तब्ध झाले.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सेनेचा उमेदवार येईल. त्यातल्या त्यात पुरुषोत्तम जाधवच पुन्हा उमेदवार असतील, अशी राष्ट्रवादीने अटकळ बांधली होती. मात्र गत वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नरेंद्र पाटील निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी शिवसेनेत जाऊन दंड थोपटतील, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र नरेंद्र पाटलांनी सातारा लोकसभेत लढण्यासाठी चक्क धनुष्यबाण हातात घेतल्याने त्यांच्या निकटवर्तीयांची गोची झाली नाही तर नवलच!
श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले...!
या चर्चेत माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना महाभारतातील श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचा दाखला दिला. पुढे कोणाबरोबर लढायचे आहे. याचा विचार करायचा नाही. सत्य-असत्य, प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती याची लढाई आहे. त्यामुळे आपण सत्याच्या बाजूनेच गेले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
शिवेंद्रसिंहराजेंनी टाळलं, रामराजेंनी आटपलं....
मेळाव्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते एका हॉटेलात थांबले होते. तेव्हा तेथे तुम्ही भाषण करायचे आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सांगायला आमदार शशिकांत शिंदे व राजकुमार पाटील आले. ‘तेव्हा मी काय बोलणार? माझे नाव त्यात घेऊ नका,’ असे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले अन् कार्यक्रमात बोलणे टाळले. तर दुसरीकडे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरांनी ‘मीही तुमच्यासारखाच उदयनराजेंचा चाहता आहे. त्यांची क्रेझ आजही टिकून आहे,’ असं सांगितले; पण मी माढा मतदार संघात येत असल्याने आपला अधिक वेळ घेणार नाही, असं म्हणून दोन-चार मिनिटांतच भाषण आटोपतं घेतलं.
म्हणे... ढेबेवाडीचा वाघ
खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडी नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढविणार आहेत. मात्र त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. मग काय उदयनराजेंनी रमेश पााटलांचा उल्लेख ढेबेवाडीचा वाघ आहे, असा मुद्दाम अन् आवर्जून केला.