माथाडी कामगार चळवळीतून घरे उभारण्यासाठी मदत करणार : नरेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:38+5:302021-07-29T04:38:38+5:30
वाई : ‘बाधित असलेले सर्व गावकरी हे माझे माथाडी बांधव आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ...
वाई : ‘बाधित असलेले सर्व गावकरी हे माझे माथाडी बांधव आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान निवास योजनेतून तसेच माथाडी चळवळीच्या माध्यमातून या बांधवांची घरे उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे,’ अशी ग्वाही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीचे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांची कोंडावळे येथील देवरूख वाडी येथे भेट घेऊन डोंगर कोसळून जमीनदोस्त झालेल्या घरांची पाहणी केली. जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यावेळी ते बोलत होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, ‘मी व माथाडी कामगार संघटना देवरूखवाडी येथील माझ्या माथाडी बांधवांबरोबर आहे. देवरूखवाडीबरोबर संपूर्ण कोंडावळे गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासन दरबारी करणार आहे. शासनाने पश्चिम भागातील शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई लवकरात द्यावी.’
यावेळी कोंडावळेचे सरपंच व गावकरी तसेच भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, नवी मुंबईचे नगरसेवक व माथाडी नेते रविकांत पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत शेलार, राहुल यादव, युवराज कोंढाळकर, स्वप्नील जाधव, सुरेंद्र जाधव, दत्तात्रय कोंढाळकर, अंकुश कोंडाळकर व भाजपा कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.