मटका ‘क्लोज’; पण मिक्स गुटखा ‘ओपन’-मल्हारपेठमध्ये सर्रास विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:14 PM2018-04-06T23:14:31+5:302018-04-06T23:14:31+5:30
मल्हारपेठ : गत महिन्यापासून मटका व्यावसायिकांवर पोलीस यंत्रणेकडून धाडसत्र सुरू असल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला आहे.
सुनील साळुंखे ।
मल्हारपेठ : गत महिन्यापासून मटका व्यावसायिकांवर पोलीस यंत्रणेकडून धाडसत्र सुरू असल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला आहे. मात्र, गुटखा बंदी असूनही परिसरात मिक्स गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याचे दिसून येत आहे.
नोटाबंदी, जीएसटी आदी कारणांमुळे बाजारपेठेत आर्थिक मंदीची लाट असतानाही तेजीत चालणारा मटका व्यवसाय पोलीस महानिरीक्षकांच्या फर्मानामुळे ‘क्लोज’ झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांतून मटका बंदीचे स्वागत होत असून, या फर्मानाची अंमलबजावणी किती दिवस राहणार? अशीही चर्चा सुरू आहे. अनेक वर्षांपासून मटक्याला बंदी आहे. सुरुवातीला ती कागदोपत्रीच होती.
जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात सर्व ठिकाणी पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे बेकायदेशीर मटका व्यवसाय बोकळला होता. मटका व्यवसायाची पाळेमुळे अगदी खोलवर रुजली असल्याने पोलीस महानिरीक्षकांनी फर्मान काढले. त्यामुळे मटक्याला चाप बसला. अनेकवेळा मटका व्यवसायास जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना, महिला व नागरिकांनी विरोध केला.
विरोध झाल्यानंतर काही दिवस मटका व्यवसाय बंद होतो. मात्र, काही दिवसांत मटका पुन्हा उभारी घेत असल्याचा अनुभव लोकांना आहे. अगदी अडाणी व्यक्तीपासून शिक्षित लोकांपर्यंत मटका खेळला जातो. मटका टपरीवर जाण्यास लाज वाटत असल्यामुळे अनेक शिक्षित मंडळी मटका घेणाऱ्या बुकीला फोनवरून मटका लावण्यास सांगत होते. अनेकांना सकाळी ‘ओपन’ व रात्री ‘क्लोज’ पाहिल्याशिवाय झोप लागत नव्हती.
सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक मटका खेळणारे विविध प्रकारची कागदे घेऊन ओपन-क्लोज पान, जोडी, संगम पान, गुणीले, डबल व एसपी, डिपी व थ्रिपी पानाला टक्केवारी जादा मिळावी म्हणून गणिती संख्या शास्त्राचे गणित तर्कशास्त्रावर मांडून मटका खेळतानाचे चित्र दिसत होते. नवीन मटका खेळण्यास सुरू करणाºयाला एक-दोनवेळा चुकून मटका लागल्यानंतर त्याला चटक लागते व तो त्यामध्ये वाहत जातो. मटक्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
चर्चा होताच जुजबी कारवाई
मटका-गुटख्याची चर्चा झाली की संबंधित ठिकाणी जुजबी कारवाई करण्याची आजपर्यंतची पोलिसांची परंपरा आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात हे चित्र असून, मटक्याप्रमाणे गुटखाही बंद झाला पाहिजे, अशी मागणी अनेकांनी केली आहे.ठराविक पानपट्टीवर आजही जादा दराने मिक्स गुटखा विक्री सुरू आहे. यावर संबंधित विभाग कोणताही ठोस पर्याय काढत नसल्यामुळे अनेक पान टपरीवर राजरोसपणे मिक्स गुटखा जादा दराने मिळत आहे. अनेक पान टपरीवाले ओळखीचा व्यक्ती असल्यानंतरच चोरून गुटखा देतात.