...तर कोरोनाग्रस्तांना घेऊन 'मातोश्री'त ठाण मांडणार; सदाभाऊंचा ठाकरे सरकारला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:32+5:302021-04-19T09:57:37+5:30
अपुऱ्या रेमडेसिविरवरून सदाभाऊ खोत आक्रमक; सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
सातारा : ‘राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने मृत्युदर वाढला आहे. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. येत्या दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा न झाल्यास कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीत ठाण मांडणार आहे,’ असा खणखणीत इशारा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खोत बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, शंकर शिंदे, प्रकाश ऊर्फ सोनू साबळे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी विविध राज्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्र शासनाने दुसरी लाट येणार म्हणून डांगोरा पिटला, पण त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. ऑक्सिजन प्लँट, औषध खरेदी, आरोग्य विभागात भरती करायला हवी होती. रस्ते किंवा इतर कामे करण्यापेक्षा माणसं वाचवायला हवी होती.
रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काही कंपन्यांबरोबरच करार केला. मात्र, राज्य शासन ६५० रुपये किंमत म्हणत आहे, तर कंपन्या १२५० रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत, असे सांगून माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राज्याने इंजेक्शन खरेदी केले नाही आणि मेडिकलवाल्यांना घेऊही दिले नाही. याचे कारण स्पष्ट आहे की, औषधनिर्माण मंत्र्यांना यातून खंडणी गोळा करायची होती. तसेच राज्य सरकार कंपन्यांवर दबाव वाढवत आहे. कमिशन मिळत नसल्याने लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे.
मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, घरात बसा अन् मेलं तर जाळून टाका हा धंदा आता राज्य शासनाने बंद करावा. नाहीतर जनतेतून उद्रेक होईल. येत्या मंगळवारी रयत क्रांती संघटना महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करून गावोगावी खंडणीखोर सरकारचे पुतळे जाळणार आहे, असा इशाराही माजी मंत्री खोत यांनी यावेळी दिला.
.........................................................